भंडारा चौफेर : देशातील पत्रकारांचे संघटन असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या भंडारा जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी सावन कुमार यांचा नुकताच सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान, जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पत्रकारांसाठी सुसज्ज बैठक कक्ष उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
हेही वाचा : घरकुलाचा निधी कधी जमा होणार? लोकप्रतिनिधींचे मौन, गरिबांचे स्वप्न अधांतरी
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेचा जिल्हा कार्यकारिणी पदग्रहण सोहळा आणि पत्रकार कार्यशाळा अलीकडेच पार पडली. या सोहळ्याला प्रशासकीय कामांच्या व्यस्ततेमुळे जिल्हाधिकारी सावन कुमार उपस्थित राहू शकले नव्हते. त्यानिमित्ताने, जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचा मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
हेही वाचा : लाखनी शहरात आयपीएल सट्टेबाजीचा सुळसुळाट? नागपूरच्या बुकींकडून ‘आयडी’ची विक्री
दरम्यान, विविध बातम्यांच्या संकलनासाठी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून पत्रकार येत असतात. मात्र, बसण्यासाठी हक्काची जागा नसल्याने गैरसोय होते. ही अडचण दूर करण्यासाठी शासकीय विश्रामगृह परिसरातील ‘बावनथडी’ किंवा ‘वाघ’ या दोन सूटपैकी एक खोली पत्रकारांसाठी नियमित बैठक व्यवस्थेसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करीत विषय समजून घेतला.
याप्रसंगी काशिनाथ ढोमने, विशाल रणदिवे, आशिष चेडगे, कालिदास खोब्रागडे, डी. जी. रंगारी, तुषार पशीने, किशोर गडकरी, राकेश शामकुंवर, संजय नागदेवे, विलास केझरकर, समीर नवाज, मुकेश मेश्राम यांच्यासह साकोली, लाखनी, पवनी, तुमसर व मोहाडी येथील तालुका अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

