>>> अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
सध्या देशात इंडियन प्रीमियर लीगचा फिव्हर शिगेला पोहोचला असताना लाखनी शहर व परिसरात क्रिकेट सट्टेबाजीने रौद्र रूप धारण केले आहे. पूर्वी छुप्या पद्धतीने चालणारा हा जुगार आता मोबाईल ॲप आणि व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून थेट गल्लीबोळांपर्यंत पोहोचला असून, या विळख्यात अडकून अनेक तरुण आपले कष्टाचे पैसे व भविष्य उद्ध्वस्त करून घेत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
सट्टेबाजीचे ‘नागपूर कनेक्शन’
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सट्टेबाजीचे धागेदोरे नागपूरपर्यंत जुळले आहेत. नागपूर येथील मुख्य एजंटकडून ठराविक रक्कमेवर विशेष आयडी आणी पासवर्ड खरेदी केले जातात. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर केवळ मॅचची हार-जीतच नव्हे, तर प्रत्येक चेंडूवर सट्टा लावला जातो. शहरातील काही मुख्य चौक, चहाच्या टपऱ्या आणि निर्जन ठिकाणे सट्टेबाजांचे अड्डे बनत असून, मॅचच्या वेळी येथे तरुणांच्या संशयास्पद हालचाली वाढल्या आहेत.
विशेष म्हणजे, महाविद्यालयीन तरुण व हातावर पोट असणारा मजूर वर्ग या सट्टेबाजीकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहे. ‘कमी वेळात श्रीमंत होण्याच्या’ मोहापायी अनेक जण सावकारी पाशात अडकत आहेत. कर्जाचा डोंगर वाढल्याने तरुणांमध्ये नैराश्य येत असून, यातूनच शहरात घरफोडी किंवा चोरी यांसारख्या गुन्हेगारी घटना वाढण्याची भीती सुजाण नागरिकांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात पोलिसांनी अलीकडेच काही ठिकाणी धाडी टाकून सट्टेबाजांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, लाखनी शहरात हे रॅकेट अत्यंत गोपनीयरीत्या आणि हायटेक पद्धतीने चालवले जात आहे. पोलिसांनी तातडीने या ‘डिजिटल जुगाराचा’ पर्दाफाश करावा अशी मागणी नागरिकांनकडून केली जात आहे.

