>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचे स्वप्न दाखवून १३ वर्षांपूर्वी साकारू पाहणाऱ्या भेल प्रकल्पाची अवस्था आज एका ‘मृत’ प्रकल्पासारखी झाली आहे. ज्या जमिनीवर समृद्धीचे पीक येईल असे वाटले होते, तिथे आज केवळ काटेरी झुडपे वाढली आहेत. शासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी दि.१३ मे रोजी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी चक्क या प्रकल्पाची १३ वी ‘पुण्यतिथी’ साजरी करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
१३ मे २०१३ रोजी मोठ्या गाजावाजात या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले होते. स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल व परिसराचा कायापालट होईल, या आशेने शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी नाममात्र दराने शासनाला दिल्या होत्या. मात्र, कालौघात हा प्रकल्प केवळ कागदावरच राहिला.दि.१३ मे २०२६ रोजी या घटनेला १३ वर्षे पूर्ण झाल्याने, प्रकल्पग्रस्तांनी हिंदू संस्कृतीतील परंपरेप्रमाणे प्रकल्पाचे ‘पुण्यस्मरण’ करून प्रशासकीय उदासीनतेचे वाभाडे काढले.
लोकप्रतिनिधींची अनास्था नडली?
प्रकल्पासाठी आम्ही जमिनी दिल्या, पण आज तिथे फक्त झुडपे वाढली आहेत. अनेक मोठे प्रकल्प जिल्ह्यातून बाहेर गेले. लोकप्रतिनिधी फक्त आश्वासने देतात, पण कृती शून्य आहे. जर ‘भेल’ शक्य नसेल, तर येथे ‘वंदे भारत’ किंवा अन्य मोठा उद्योग सुरू करावा, अन्यथा आमच्या जमिनी आम्हाला परत कराव्यात अशी भावना भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजय नवखरे यांनी व्यक्त केली.
रोजगाराचे स्वप्न धुळीला
भंडारा जिल्हा औद्योगिकदृष्ट्या मागासलेला राहण्यास शासन व स्थानिक लोकप्रतिनिधी कारणीभूत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्र ओसाड पडले असून, व्हिडीओकॉन आणि ह्युंदाईसारखे प्रकल्प रखडल्याने बेरोजगारीची समस्या गंभीर झाली आहे. या १३ व्या पुण्यतिथी आंदोलनाच्या माध्यमातून आता तरी शासनाला जाग येईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

