>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
राज्य शासनाने सुगंधी तंबाखू व गुटख्यावर बंदी घातली असली तरी, लाखनी शहरात मात्र चित्र वेगळेच पाहायला मिळत आहे. शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर सुगंधी तंबाखूचा पुरवठा होत असून, दररोज लाखो रुपयांची अवैध उलाढाल होत असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या नाकाखाली हा प्रकार सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकणे पडले महागात; सरपंचासह ९ जणांवर गुन्हा दाखल
सुगंधित तंबाखूच्या एका ख-र्याची विक्री ५० ते ६० रुपयांना होते. दिवसभर लाखनी शहरात ४ ते ५ हजार ख-र्याची विक्री होते. यावरून सुगंधित तंबाखूचा वापर किती प्रमाणात होतो याचा अंदाज येतो. प्रामुख्याने मजा आणि ईगल या दोन कंपन्यांचा सुगंधित तंबाखू जास्त प्रमाणात विक्री केला जातो.
छुप्या मार्गाने होतो पुरवठा
मिळालेल्या माहितीनुसार, शेजारी राज्यांतून मालवाहू वाहनांच्या आडून सुगंधी तंबाखूचा साठा लाखनी शहरात आणला जातो. शहरात काही ठराविक दलाल व मोठे विक्रेते सक्रिय असून, सदर माल चिल्लर पानटपऱ्या व छोट्या व्यापाऱ्यांना पोहोचवला जातो. कारवाई टाळण्यासाठी हा व्यवहार अत्यंत गोपनीय पद्धतीने आणि ‘कोडिंग’ भाषेत केला जातो.
हेही वाचा : घरकुलाचा निधी कधी जमा होणार? लोकप्रतिनिधींचे मौन, गरिबांचे स्वप्न अधांतरी
रात्रीच्या सुमारास मालाची आवक-जावक होते. एका दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. स्वस्त दरात व सहज उपलब्ध होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांपासून ते मजुरांपर्यंत अनेकजण या जीवघेण्या व्यसनाच्या आहारी जात आहेत. बंदी असल्यामुळे चढ्या दराने विक्री करून विक्रेते गब्बर होत आहेत.
अन्न व औषध प्रशासन व स्थानिक पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अधूनमधून होणारी थातुरमात कारवाईमुळे या माफियांनी डोकेवर काढले आहेत. शहरात याचे व्यापारी कोण हे माहिती असताना कारवाई का होत नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
साठा केंद्राला कोणाचा आशीर्वाद?
लाखनी शहरात येणारा लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा आठवडी बाजार चौकातील एका ‘भाई’कडे उतरविला जातो. तेथून त्या तंबाखूच्या डब्यांची इतर चिल्लर विक्रेत्यांकडे विल्हेवाट लावली जाते. मात्र, याकडे पोलीसच नाही, तर अन्न प्रशासन विभागही डोळेझाकपणा करीत आहे.

