लाखनी : शहरात गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर दोन सराईत गुन्हेगारांनी हल्ला चढवत एका पोलीस शिपायाचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पोलीस शिपायाची शासकीय वर्दी फाडण्यात आली असून, ‘तुला पाहून घेतो’ अशी धमकी देत आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बुधवार, १३ मे रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास लाखनी येथील आयशा मशीद रोडवर ही घटना घडली.
पोलीस निरीक्षक बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामटेके, वडेटवार, निंबार्ते, सूर्यवंशी व फिर्यादी पोलीस शिपाई भुपेश सेवकराम हटवार (३५) हे परिसरात पेट्रोलिंग करीत होते. काही संशयित गुन्हेगार परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
गस्तीदरम्यान आरोपी भीमराज नेमीचंद मेश्राम (३२) व धम्मराज नेमीचंद मेश्राम (२९) (रा. सेलोटी) हे मोटारसायकलने (क्रमांक एम.एच. १४-एच.आर.-९९४४) येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून कागदपत्रांची विचारणा केली असता, दोन्ही आरोपींनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. भीमराज मेश्राम याने सार्वजनिक रस्त्यावरच पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या भुपेश हटवार यांना मारहाण करून आरोपीने त्यांची वर्दी फाडली. एवढेच नव्हे तर खांद्याची नेमप्लेट आणि लाईनयार्ड तोडून टाकले. रागाच्या भरात भीमराजने हटवार यांचा गळा दाबून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच स्वतःचे डोके रस्त्यावर आपटून पोलिसांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. दुसरा आरोपी धम्मराज मेश्राम यानेही चिथावणीखोर वक्तव्य करून आरोपीला साथ दिली व घटनास्थळावरून दुचाकीसह पळ काढला.
या गंभीर प्रकारानंतर पोलीस शिपाई भुपेश हटवार यांच्या तक्रारीवरून लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), १२१(१), १३२, २९६ आणि ३(५) अन्वये आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

