>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या साकोली येथील ऐतिहासिक जुन्या मालगुजारी तलावाच्या (गट क्र. २४१) पुनरुज्जीवनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आमदार तथा माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने या कामासाठी ४ कोटी १ लाख ४४ हजार ६३५ रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. या निर्णयामुळे परिसरातील सिंचनाचा प्रश्न सुटणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अतिवृष्टीमुळे कोलमडली होती सिंचन व्यवस्था
काही काळापूर्वी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे या ऐतिहासिक मालगुजारी तलावाची पाळ फुटली होती. तलाव फुटल्यामुळे त्याची पाणी साठवण क्षमता पूर्णतः नष्ट झाली होती. याचा थेट परिणाम सिंचन व्यवस्थेवर होऊन शेकडो शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले होते. खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्यास पिके करपण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले होते. शेतकऱ्यांची ही कैफियत लक्षात घेऊन आमदार डॉ. परिणय फुके यांनी या कामासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे आग्रही मागणी लावून धरली होती.
अधुनिक तंत्रज्ञानाने होणार दुरुस्ती
मंजूर झालेल्या ४.१० कोटींच्या निधीतून तलावाचे केवळ डागडुजी न करता त्याचे पूर्णतः नूतनीकरण केले जाणार आहे. यात प्रामुख्याने: फुटलेली पाळ पुन्हा बांधून तिची उंची व क्षमता वाढवली जाईल. पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचे गेट्स बसवण्यात येणार. शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी काँक्रीटच्या कालव्यांची निर्मिती केली जाणार. तलावाच्या सुरक्षेसाठी दगडी पिचिंग आणि काँक्रीटची संरक्षक भिंत उभारली जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला बळ
या प्रकल्पामुळे साकोली परिसरातील तब्बल ७४.८५ हेक्टर सिंचन क्षमता पुन्हा कार्यान्वित होणार आहे. शाश्वत सिंचनाची सोय झाल्यामुळे केवळ खरीपच नव्हे, तर रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना फायदा घेता येईल. यामुळे परिसरातील शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
साकोली परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्यांची मला पूर्ण जाणीव होती. तलाव फुटल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते, त्यामुळे या कामासाठी निधी मिळवणे हे माझे कर्तव्यच होते. या निधीतून दर्जेदार काम करून घेतले जाणार. जेणेकरून भविष्यात सिंचनासाठी बळीराजाला कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
— आमदार . डॉ. परिणय फुके

