लाखनी : शहरात क्रिकेट सट्टेबाजीने पाय पसरले असून, तरुण पिढी या दलदलीत रुतत चालल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, या गंभीर प्रकारानंतरही सट्टेबाजांचे जाळे कमी होण्याऐवजी अधिक विस्तारत असल्याचे चित्र आहे. आता नागरिकांमधून एकच प्रश्न विचारला जात आहे.लाखनीतील या हायटेक जुगाराला नेमके अभय कुणाचे?
हप्तेखोरी की यंत्रणेची डोळेझाक?
शहरातील मुख्य चौक आणि गल्लीबोळांत मोबाईलवर आयडी चालवून लाखो रुपयांची हार-जीत होत असताना स्थानिक पोलीस प्रशासनाला याची कुणकुण कशी लागत नाही, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. नागपूरच्या बुकींशी थेट संपर्क ठेवून लाखनीतील ‘लहान मासे’ मोठे जाळे विणत आहेत. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या व्यवसायात काही ‘पांढरपेशी’ व्यक्तींचे पडद्यामागून पाठबळ असल्यानेच सट्टेबाजांचे धाडस वाढले आहे. ‘ठराविक वसुली’च्या बदल्यात या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आता शहरात उघडपणे रंगू लागली आहे.
डिजिटल वॉलेट’चा वापर आणि गुप्त व्यवहार
सध्या सट्टेबाजीसाठी फोन-पे, गुगल-पे चा वापर करून पेमेंट केला जात आहे. यामुळे पोलिसांना तांत्रिक पुरावे गोळा करणे कठीण जात असले तरी, सायबर सेलच्या मदतीने या व्यवहारांचा शोध घेणे शक्य आहे. मात्र, तपासाची चक्रे फिरवण्याऐवजी केवळ ‘छापेमारीचे नाटक’ केले जाते की काय? असा संतप्त सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे. दरम्यान,शहरातील काही भागात रात्रीच्या वेळी संशयास्पद तरुणांचा वावर वाढला असून, यातूनच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.लाखनीचे उद्ध्वस्त होणारे भविष्य’ वाचवण्यासाठी पोलीस कठोर पावले उचलणार की सट्टेबाजांचे हे रॅकेट असेच फोफावत राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केवळ लहान एजंटवर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही. नागपूर कनेक्शन मोडून काढण्यासाठी व लाखनीतील मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष पथक नेमावे.
—शहरातील एक जागरूक नागरिक

