>>>>>भंडारा चौफेर | प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती व्यवस्थीत ठेवण्यात सभासद संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत आले आहे. त्याचा परिणाम जिल्हा बँक २००५-०६ पासुन सतत निव्वळ नफ्यात राहीली आहे. गेल्या अनेक वर्षापासुन जिल्हा बँक सभासद संस्थांना लाभांस देऊ शकली नाही. चालु आर्थिक वर्षात बँकेला ४५०.८३ लक्ष रुपयाचा नफा झाला आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षी प्रमाणे ४ टक्के लाभांस देण्यात येईल, अशी घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केली.
यावेळी ते लक्ष्मी सभागृहात आयोजीत जिल्हा बँकेच्या २१ व्या आमसभेत बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची २१ वी आमसभा शनिवार दि. २८ सप्टेंबर रोजी लक्ष्मी सभागृहात पार पडली. या आमसभेला जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणुन सुनील फुंडे यांनी बँकेच्या कामगारी बाबत व पुढील वाटचालीबाबत उपस्थित सभासदांना माहिती दिली.

यावेळी त्यांनी सांगीतले कि, जिल्हा बँकेमधुन ज्या कर्मचार्यांचे पगार होत आहे अशा सर्व कर्मचार्यांना ‘सॅलरी पॅकेज’’ योजनेंतर्गत ३० लक्षपर्यंत अपघात विमा संरक्षण योजना लागु केली आहे. अशी माहिती देऊन अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. बँकेकडुन कर्ज घेतांना सर्व संबंधित संस्थांना कायदेशिररित्या करार करुन देणे बंधनकारक आहे व त्या कराराला संस्थेचे सर्व संचालक मंडळ जवाबदार असते.
एखादया अप्रिय प्रसंगी कायदेशिर कार्यवाही झाल्यास सर्व संचालक मंडळावर ही कार्यवाही होवु शकते त्यामुळे या महत्वपुर्ण बाबींकडे संस्थांनी दुर्लक्ष करणे घातक ठरु शकते. सहकारी कायदयाने १५ मे अखेरपर्यंत वार्षिक हिशोब पत्रके सादर करणे बंधनकारक आहे.
काही संस्थांनी निर्धारीत वेळेचे पालन केले नाही तरीही शेतकर्यांच्या सोयीसाठी कर्जपुरवठा बँकेने सुरु केला. परंतु शासनाकडुन मिळणार्या व्याजाचे प्रस्ताव वेळीच सादर न केल्यामुळे संस्थांचे व बॅकेचे नुकसान होते. प्रसंगी कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागते. शेतकर्यांना कर्जवाटप करतांना सेवा सहकारी संस्थांची महत्वपुर्ण भुमिका असते.
संस्थेचे पदाधिकारी हे शेतकरी सभासदांतुन आले असतात परंतु संस्थेचा गटसचिव संस्थेचा दैनंदिन व्यवहार बघत असतो, मात्र अनेक संस्थांमधील अवाजवी खर्च, अफरातफर/आर्थिक गैरव्यवहार यामुळे निर्माण होणारी अनिष्ट तफावत बँकेच्या व संस्थेच्या भवितव्यावर गंभीर संकट उभे करत असल्याचे सांगीतले.
बँकेला संलग्न ३६८ सेवा सहकारी संस्थांपैकी चालु वर्षात ३३३ संस्थांमधे अनिष्ट तफावत असुन अनिष्ट तफावतीची एकुण रक्कम १११.०० कोटी आहे. ज्या गटसचिवांनी किंवा संस्थेच्या पदाधिकार्यांनी आर्थिक गैरव्यवहार केले त्यांचेवर वसुली संबंधाने कठोर कारवाई करणे बँकेच्या व संस्थेच्या हिताकरीता आवश्यक आहे.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था भंडारा यांनीही आपल्या यंत्रणेमार्फत प्रभावी नियंत्रण ठेवावे. जेणेकरुन संस्थेचे आर्थिक व्यवहाराची निश्चित जवाबदारी ठरविता येईल. संस्थांनी नियुक्त केलेले स्वतंत्र गटसचिव सुध्दा अवास्तविक खर्चात मागे नसल्याने फुंडे यांनी चिंता व्यक्त केली.
बॅकेची प्रत्येक शाखा नफ्यात असावी असा नाबार्डचा आग्रह असुन तोटयातील शाखांचा तोटा समायोजित केल्यानंतर बॅक ४५०.८३ लक्षने नफ्यात आहे. परंतु प्रत्येक शाखा नफ्यात येणेसाठी, प्रत्येक शाखेतील कर्ज पुरवठयात प्रमाणबध्द वाढ होणे व वसुली १०० ³ होणे गरजेचे आहे. बँकेने अद्यावत सॉफ्टवेअर लावले असुन उच्च दर्जाचे एटीएम उपलब्ध करुन दिले आहे.
बॅकेचे (सी.बी.एस.) संगणकीकरण झाले असले तरी बँकेच्या अपुर्या कर्मचारी संख्येमुळे ग्राहकांची गैरसोय होते, याची मला जाणीव आहे. बॅकेच्या मंजुर आकृतीबंधाप्रमाणे ४६८ कर्मचारी सर्व ग्राहक सेवा व व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असताना दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी फक्त २१७ कर्मचारी कार्यरत आहेत. बॅकेची आर्थिक स्थिती व ग्राहक सेवा सुरळीत राहणेसाठी कर्जपुरवठा तसेच कर्जवसुली, बॅक शाखांची नियमीत तपासणी या अत्यंत आवश्यक बाबीं आहेत.
यासाठी सर्व सभासद व ठेवीदार, कर्जदार, बॅकेचे माझे सर्व सहकारी संचालक, जेष्ठ सहकारी, बॅकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सेवा सहकारी संस्था तसेच ईतर सर्व संस्थांचे संचालक मंडळ, सर्व संस्थांचे गटसचिव बॅकेचे हितचिंतक या सर्वाचे सहकार्य महत्वाचे आहे.
ते सतत मिळत राहावे अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा बॅक तुमची आमची सर्वांची आहे, तिचा विकास करणे, बँकेला यशाच्या शिखरावर नेणे ही आपली सर्वांची संयुक्त जबाबदारी असल्याचे सांगीतले. या आमसभेला बँकेचे सर्व संचालक, जिल्ह्यातील सभासद संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.