>>> अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नगर परिषद निवडणुकांचा ज्वर वाढला असताना, जिल्ह्यातील चार महत्त्वपूर्ण नगरपालिकांमध्ये मात्र उमेदवारांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. भंडारा, तुमसर, साकोली आणि पवनी नगर परिषदेसाठी १० ते १७ नोव्हेंबरदरम्यान अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण पहिल्याच दिवशी (सोमवार, १० नोव्हेंबर) एकाही इच्छुकाने नामांकन अर्ज दाखल केलेला नाही. उमेदवारांच्या या ‘सावध’ पावलांमागे मोठे राजकीय अर्थ दडलेले असल्याचे स्पष्ट होते.
‘ग्रीन सिग्नल’ नंतरच पुढचे पाऊल
पहिल्या दिवशी शून्य नामांकन दाखल होण्यामागे मुख्य कारण म्हणजे तिकीट निश्चितीचा घोळ. अनेक इच्छुक उमेदवार पक्षाच्या ‘ग्रीन सिग्नल’च्या प्रतीक्षेत आहेत. तिकीट मिळाल्याची खात्री झाल्यानंतरच अधिकृतपणे अर्ज दाखल करण्याची रणनीती असल्याचे समोर येत आहे. यामुळे पक्षांतर्गत राजकारणात सध्या तीव्र हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. अपक्ष उमेदवारांनीही अद्याप कोणताही उत्साह दाखवलेला नाही. त्यामुळे मोठे राजकीय पक्ष संभाव्य बंडखोरांवर सध्या संपूर्ण लक्ष केंद्रित झाले आहे.
प्रचारसाठी फक्त ६ दिवसांचा ‘क्रंच टाईम’
या निवडणुकीचा कार्यक्रम अत्यंत कमी वेळेत आखण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी वेळापत्रक जाहीर केल्यापासून केवळ २८ दिवसांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे. नामांकन मुदत १० ते १७ नोव्हेंबर चिन्ह वाटप २६ नोव्हेंबर, मतदान २ डिसेंबर मतमोजणी ३ डिसेंबर.
विशेष म्हणजे, २६ नोव्हेंबरला चिन्ह वाटप झाल्यानंतर मतदानासाठी उमेदवारांना केवळ ६ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. तर प्रचारासाठी प्रभावीपणे केवळ ५ दिवस मतदानाच्या २४ तास आधी जाहीर प्रचार बंद.स्वबळावर लढणाऱ्या व मजबूत पक्ष संघटना असलेल्या पक्षांसाठी चिन्ह आणि प्रचार पोहोचवणे तुलनेने सोपे राहील.अपक्ष उमेदवार तसेच ऐनवेळी आघाडी करून लढणाऱ्या उमेदवारांना हा ‘क्रंच टाईम’ अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे.
‘डिजिटल वॉर’: सोशल मीडियाचा सहारा
वेळेची मर्यादा असल्याने, इच्छुक उमेदवारांनी सध्या सोशल मीडियावर जोरदार आघाडी उघडली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपवर मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागातील जुन्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रचार करणे अजूनही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे डिजिटल प्रचार आणि प्रत्यक्ष संपर्क यांचा मेळ साधणे, हे उमेदवारांपुढे मोठे आव्हान आहे. राजकीय पंडितांच्या मते, तिकीटवाटप तसेच अर्ज माघारीच्या शेवटच्या टप्प्यातच या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. आता उमेदवारांचा सावध पवित्रा केवळ शांततेपूर्वीचे वादळ आहे असे मानले जात आहे.

