>>> भंडारा चौफेर | प्रतिनिधी
शिवसेना (शिंदे गट) मध्ये होत असलेल्या मोठ्या पक्षप्रवेशांच्या पार्श्वभूमीवर, जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठायला सुरुवात झाली आहे. भंडारा येथील युवासेना पदाधिकारी प्रवीण कळंबे यांनी यासंदर्भात थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून प्रभाग क्रमांक ५ मधून आपली उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे.
निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी द्या
कळंबे यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, भंडारा शहरात शिवसेनेचे (शिंदे गट) संघटन अत्यंत मजबूत आहे. मात्र, आगामी निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतून प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य न देता, ज्यांनी पक्षासोबत निष्ठावान राहून वर्षानुवर्षे पक्षाच्या वाढीसाठी परिश्रम घेतले आहेत, त्या जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी मिळणे आवश्यक आहे.निवडणुकीच्या तोंडावर येणाऱ्यांना प्राधान्य न देता, पक्षाशी निष्ठावान राहिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी. पक्षाच्या वाढीसाठी वर्षानुवर्षे परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा,” अशी कळंबे यांची मुख्य मागणी आहे.
‘शिंदे गटा’तील कार्यकर्त्यांमध्ये चर्चा
युवासेना पदाधिकारी प्रवीण कळंबे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे ‘शिंदे गटा’मध्ये अंतर्गत चर्चांना उधाण आले आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पक्षप्रवेशामुळे मूळ कार्यकर्त्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याची चर्चा आहे. कळंबे यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही भावना बोलून दाखवल्याने, आता पक्षश्रेष्ठी या मागणीवर आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावनांवर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

