>>>चौफेर प्रतिनिधी | लाखनी
भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या 2025 ते 2030 या कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत लाखनी तालुक्यातील लढत चुरशीची ठरली आहे. सामान्य सभासदांनी तालुकावार निवडलेल्या प्रतिनिधी प्रवर्गातून भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) प्रणीत संघटना पॅनलचे चंद्रशेखर श्रीराम टिचकुले (छत्री), काँग्रेस-शिवसेना (शिंदे) समर्थित शेतकरी पॅनलचे शरद यादव कोरे (कपबशी) आणि अपक्ष उमेदवार विनायक सोमा बुरडे (गॅस सिलेंडर) यांच्यात तिरंगी लढत होत आहे. अपक्ष उमेदवार विनायक बुरडेंचा सहकार आणि राजकारणातील दांडगा अनुभव पाहता ते बाजी मारण्याची शक्यता असल्याने तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय दिग्गज मैदानात, प्रचाराला जोर
28 जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. मध्यवर्ती सहकारी बँक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर नजर ठेवून विधान परिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके, मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार नाना पटोले आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
उमेदवारांचे बळ
लाखनी तालुक्यातील 28 सभासद या निवडणुकीत मतदान करणार आहेत. संघटना पॅनलचे उमेदवार चंद्रशेखर टिचकुले यांचे वडील स्व. श्रीराम टिचकुले हे भाजपाचे कद्दावर नेते होते. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे. शेतकरी पॅनलचे शरद कोरे हे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचे विश्वासू समर्थक असून, जातीगत समीकरणांमुळे त्यांच्याकडे बऱ्यापैकी मतदारसंख्या आहे.
दुसरीकडे, अपक्ष उमेदवार विनायक बुरडे हे मावळते संचालक असून, त्यांनी सरपंच, पंचायत समिती उपसभापती, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती आणि सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनीचे उपसभापती अशी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. सहकार आणि राजकारणातील त्यांचा दांडगा अनुभव त्यांना आघाडीवर ठेवत आहे.
दूध संघाचे राजकीय गणित
भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघावर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या राजकीय घडामोडींमुळे ही युती तुटली. यामुळे आता भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) प्रणीत संघटना पॅनल आणि काँग्रेस-शिवसेना (शिंदे) समर्थित शेतकरी पॅनल यांच्यात थेट लढत होत आहे. यातच अपक्ष उमेदवार विनायक बुरडेंनी स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने ही लढत आणखी रंगतदार बनली आहे.
अपक्ष उमेदवार ठरणार गेमचेंजर?
विनायक बुरडेंचा सहकार क्षेत्रातील अनुभव आणि स्थानिक पातळीवरील त्यांचा जनसंपर्क पाहता, ते निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल देऊ शकतात, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. त्यांच्या अनुभवामुळे सामान्य सभासदांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आहे. त्यामुळे लाखनीत अपक्ष उमेदवार बाजी मारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीचा कौल काय?
28 जून रोजी होणाऱ्या मतदानात कोणता उमेदवार बाजी मारणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सहकार क्षेत्रातील ही निवडणूक लाखनी तालुक्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम करू शकते, अशी शक्यता जानकरांकडून वर्तविण्यात येत आहे.