>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
यंदाच्या पावसाळ्यात सात्याला (जंगली मशरूम) अनुकूल हवामान असतानाही नैसर्गिक कारणांमुळे बाजारातील सात्याचे भाव गगनाला भिडले आहेत. प्रति किलोमागे तब्बल 800 रुपये मोजावे लागत असून, पावभर सात्याची किंमत 200 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. जंगलातील ही नैसर्गिक वनसंपदा खवय्यांमध्ये आवडीची असली तरी कमी उत्पादनामुळे मागणी वाढली आहे.
यंदा पावसाने जोर धरला असला, तरी सात्याचे आगमन उशिराने झाले. वारूळ, पालापाचोळा आणि कचऱ्याच्या ठिकाणी उगवणाऱ्या सात्याची उगवण क्षमता यंदा कमी झाली आहे. परिणामी, आदिवासी आणि ग्रामीण भागातील लोकांचा हंगामी रोजगार धोक्यात आला आहे. सात्या गोळा करण्याचे काम जोखमीचे असून, सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे सकाळी जंगलात जाणे धोकादायक ठरते. गोळा केलेल्या सात्यांना स्वच्छ धुऊन बाजारात विक्रीसाठी आणले जाते, पण कमी उपलब्धतेमुळे भाव वाढले आहेत.
बाजारात मागणी, पण पुरवठा कमी
गेल्या आठवड्यापासून बाजारात सात्या उपलब्ध असल्या तरी कमी उत्पादनामुळे ग्राहकांना हवी तशी उपलब्धता नाही. दोन-तीन दिवसांपूर्वी 1200 रुपये प्रतिकिलो असलेल्या सात्यांचे भाव आता 800 रुपयांवर पोहोचले आहेत. “सात्याची आवक घटल्याने मागणी वाढली आहे. ग्राहकांना हव्या त्या दराने सात्या विकत घ्याव्या लागत आहेत.
खाण्यायोग्य सात्यांच्या मर्यादित प्रजाती
जंगलात अनेक प्रकारच्या सात्या उगवत असल्या तरी खाण्यायोग्य प्रजाती मर्यादित आहेत. डुंबर सात्या, तनस सात्या, अनस सात्या आणि वेळू सात्या यांसारख्या प्रजाती खाण्यास योग्य आणि औषधी गुणधर्म असलेल्या मानल्या जातात. वर्षातून एकदा जिभेचे चोचले पुरवणारी ही सात्या शहरी भागातही कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे.
सात्या गोळा करणे हा आदिवासी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी अल्पकालीन रोजगाराचा स्रोत आहे. मात्र, यंदा कमी उत्पादनामुळे त्यांची रोजीरोटी हिरावली गेली आहे. सात्या मिळेनाच, तर कमी दरात विकायचे कसे? अशी खंत स्थानिक सात्या विक्रेते व्यक्त करत आहेत. बाजारातील पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने सात्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

