>>>>>>भंडारा चौफेर | अतुल नागदेवे
राज्यात विधानसभा निवडणूक २०२४ साठी मतदान २० नोव्हेंबर रोजी शांततेत झाले. आता राजकीय पक्षांपासून सामान्य जनतेलाही निवडणूक निकालांची उत्सुकता लागून आहे. साकोली विधानसभेचा गड कोण राखणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (२३ नोव्हेंबर) च्या संध्याकाळपर्यंत निकाल स्पष्ट होणार असले तरी निकालापूर्वी वातावरण चांगलाच तापला आहे.
या मतदानसंघात पुरुषांचे १ लक्ष ६४ हजार १०२ मतदान आहे. तर,१ लक्ष ६४ हजार ३७४ महिलांचे मतदान आहेत. साकोली विधानसभेत एकूण ३ लाख २८ हजार ४७६ मतदात्यांची संख्या आहे. यावेळी २ लक्ष ३२ हजार ६३९ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी १ लक्ष १७ हजार ४९४ पुरुष तर, १ लक्ष १५ हजार १४५ महिलांचा समावेश आहे. साकोली विधानसभा मतदारसंघात एकूण ७०.८२ टक्के मतदान झाले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुमारे ७१.१६ टक्के मतदान झाले होते.
या, मतदारसंघात यावेळी अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात होते.यात प्रामुख्याने महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले तर, महायुतीकडून भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अविनाश नान्हे, तसेच अपक्ष उच्च शिक्षित उमेदवार डॉ. सोमदत्त करंजेकर लढतीत होते. याचबरोबर बसपा सहीत एकुण १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
यामध्ये मुख्य लढत काँग्रेसचे नाना पटोले व भाजपचे अविनाश ब्राम्हणकर यांच्यात झाली असली तरी, अपक्ष उमेदवार डॉ.सोमदत्त करंजेकर यांच्यामुळे यावेळी चुरशीची लढत झाली. अपक्ष म्हणून डॉ.सोमदत्त करंजेकर प्रभावी ठरल्याचे मतदारांत बोलले जात आहे.
भाजपकडून तिकीट न मिळाल्याने करंजेकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत हायटेक प्रचाराद्वारे मतदारांपर्यंत आपला संदेश पोहचवला. दरम्यान, त्यांच्या समर्थनात भाजपचे माजी आमदार बाळा काशीवार व माजी जि.प.अध्यक्ष एड.वसंत एंचीलवार सक्रिय होते.
निवडणुकीसाठी मतदान संपल्यावर बहुतांश एक्झिट पोल्समध्ये भाजपच्या महायुतीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी अंतिम निकालापूर्वी खात्रीने काहीही सांगने चुकीचे ठरेल. मात्र, या मतदारसंघात एकंदरीत डॉ.सोमदत्त करंजेकर यांच्यामुळे तिरंगी लढत झाली. यामुळे जनतेत उत्सुकता कायम असून, साकोली मतदारसंघात विजय कोणाचा? कोण पराभूत? कोण मारणार बाजी? याकडे नागरिकांचे मोठया प्रमाणात लक्ष लागले आहे.