>>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
शिस्त, नियोजन, पक्षश्रेष्ठींचा आदेश मानणारा प्रत्येक कार्यकर्ता, कोणत्याही विषयावर एकवाक्यता आणि एकसंघता, सत्तेपेक्षा विरोधात राहून जनतेचे प्रश्न अभिनव पद्धतीने मांडणे, आंदोलन असो की सभागृह तेथे पोटतिडकीने बोलणे आणि हेच भारतीय जनता पक्षाचे बलस्थान होते. सोबतीला गावागावातील मतदाराला भाजपच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रचारक म्हणून गावात जाऊन राहायाचे आणि स्वार्थाचे कोणतेही भान न ठेवता काम करण्याची तयारी ठेवणाऱ्या संघ स्वयंसेवकांची साथ होती.
हेही वाचा : गावकारभाऱ्यांचे मानधन अन् रुबाबही वाढला
संघाला कधीही सत्ता नको होती; पण संघ विचाराचा भाजप जर देश आणि राज्यात सत्तेत आला तर प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाचे स्वप्न साकार होईल ही त्यांची तळमळ होती. गेल्या दहा वर्षांपर्यंत भाजपचा प्रत्येक नेता यासाठीच लढत होता. काँग्रेस विरोधात जेव्हा दोन खासदार देशात निवडून आले तेव्हाही पूर्व विदर्भातील भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील जनतेने लक्ष्मणराव मानकर गुरुजी, शामरावबापू कापगते, नामदेवराव दिवटे, महादेवराव शिवणकर, खुशाल बोपचे या भाजपच्या शिलेदारांना वेळोवेळी निवडून दिले होते.
हेही वाचा : अखेर… इंदापूरच्या माजी आमदारांचा भाजपला रामराम
अख्खी काँग्रेस एकीकडे आणि भाजपाचे हे शिलेदार दुसऱ्या बाजूला पण ते कधी झुकले नाही आणि आमिषालाही कधी बळी पडले नाही. एकला चलो रे, म्हणून निघालेल्या भाजपात आज काफिला तयार झाला आहे. पक्षाची दिशा बदलली आणि नाही म्हणत असले तरी विचारालाही धार राहिली नाही. नेहमी हरणाऱ्या भाजपने २०१४मध्ये पक्षाच्या नव्हे तर व्यक्तीच्या नावाने निवडणूक लढवली, ‘अब की बार मोदी सरकार, भाजपचा हा डायलॉग यशस्वी तर झाला पण त्याला नंतर अहंकाराची किनार तयार झाली.
ही किनार गडद होत असताना, केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही भाजपची दुसरी आणि राज्यातील व्यक्तिकेंद्रित निवडणूक लढवली गेली. त्यातही मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार या कानठळ्या बसवणाऱ्या भाषणांनी तर सामान्य जनताच काय तर पक्षातील कार्यकर्ताही अस्वस्थ झाला होता. २०१४ ला लोकसभा व राज्यातील विधानसभेत मिळालेल्या पाशवी यशाने नेत्यांमध्ये आलेला हा आत्मविश्वास होता की अहंकार हे साऱ्या जनतेने २०१९च्या निवडणुकीत पाहिले आणि जे घडायचे ते घडले.
हेही वाचा : आचारसंहिता १३ ऑक्टोबरपासून ? सत्ताधारी पक्षांसह विरोधकांचीही लगबग सुरु
एवढे होऊनही भाजपातील नेते आणि कार्यकर्ते सुधारणार नसतील तर त्यांच्यापेक्षा उघडपणे खळ्ळखट्याक आणि राडा करणारे पक्ष बरे. कारण त्यांचा स्वभाव आणि कार्यपद्धतीची जनतेला ओळख आहे. त्यांच्या मागे धावणारा विशिष्ट वर्ग आहे. पण जे स्वतःला राष्ट्रीय आणि व्यापक विचारांचा पक्ष समजतात आणि कुटिल राजकारण करत असतील तर का म्हणून लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा.
आजकाल शिस्त मोडून काहीही होऊ लागले तसे राजकारणात काहीही होऊ शकते, असे म्हणत कुणीही कुणाच्या गळ्यात माळ टाकायला लागले आहेत. खूप खूप बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी कुणाला काहीही न सांगत्ता लपूनछपून अजित पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या गळ्यात भल्या पहाटे सत्तेची माळ टाकली.
सदैव नाकापुढे चालणारी शेजाऱ्याची मुलगी जेव्हा एखाद्या उनाड मुलाबरोबर पळून गेल्याची बातमी भल्या पहाटे ऐकून धक्का बसावा तसे उभ्या महाराष्ट्रातील जनतेला पहाटे सरकार स्थापन झाल्याची बातमी ऐकून झाले होते. अर्थात, अंधारात सुरू झालेला संसार रात्रीतून मोडला. कारण राजकारणात काहीही होऊ शकते. यांनी असे केले म्हणून आम्ही तसे केले. त्यांनी तसे केले म्हणून यांनी तसे केले. आता जनतेने काय करावे हाच विचार करण्याची वेळ आली आहे.
विशेष म्हणजे २०१४ ला राज्यात भगवा फडकल्यानंतर नागपूरातील मनमर्जीतल्या नेत्यांचे पूर्नवसन करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी नेहमीच भंडारा गोंदिया जिल्ह्यावर कुरघोडी केली. ज्या भंडारा जिल्ह्याने २०१४ ला भाजपला तीन आमदार व एक खासदार दिला, त्या जिल्ह्यातील भाजप नेत्यांना मात्र कधीही स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद वा शिक्षक पदविधर मतदारसंघातून आमदारकी दिली नाहीच, तर महामंडळावरही सामावून घेतले नाही.
सत्तेच्या काळात नेते जसे हुकूमशाह होऊ लागले तसे कार्यकर्तेही झाले आहेत. कुणीच कुणाचे ऐकणारे नसल्यावर राडा हा होणारच. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने भंडारा गोंदिया जिल्ह्यात लुडबुड करणाऱ्या नागपूरच्या एका नेत्यावर विश्वास ठेवत जिल्ह्यातील तीनही भंडारा, साकोली व तुमसर विधानसभेच्या सिंटींग आमदारांचे तिकीट कापले गेल्यानंतर उमेदवार बदलला.
याचा परिणाम असा झाला की भाजपाला आपल्या तिनही जागा गमवाव्या लागल्या. या निवडणुकीत साकोली व तुमसर विधानसभा मतदारसंघात निवडणुक काळात जे घडले त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या शिस्तीची लक्तरे देशभर टांगली गेली होती. त्यामुळे जिल्ह्यात कोणतीही भाजपची बैठक असली की मीडिया झाडून हजर असते, कारण केव्हा कोण राडा करेल हे सांगता येत नाही. एवढी कुख्यात प्रत्तिमा भाजपची झाली आहे.
काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने सत्ता राखण्यासाठी जो राडा केला त्यामुळेही भाजपाचे काही जि. प. सदस्यांनी भाजपाची साथ सोडली. या घटनेला काही दिवस उलटत नाही, तोच जिल्हा संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या राजकारणाने (ना)राजीनामा नाट्याचे पडसाद उमटले.
सण २०१४ पूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची निवड ही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने होत असे. कोण कोणत्या गटाचा आहे हे न पाहता पक्ष संघटनेतील त्याचे योगदान, संघटना बांधणीचे कौशल्य हे सारे बघून नेमणूक केली जात होती. पण भाजपच्या नेत्यांची कार्यपद्धती बदलली तशी कार्यकत्यांचीही बदललेली पाहायला मिळत आहे.
शह-काटशहाच्या राजकारणात भाजपमध्ये भंडारा जिल्ह्यात फूट पडून ‘शतप्रतिशत भाजप’ या महत्त्वाकांक्षी अभियानाला लगाम बसत चालला आहे. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भंडारा गोंदिया सह विदर्भातील काही मतदारसंघात भाजपा उमेदवाराचा पराभव होणे ही नेतृत्व बदलाची पहिली हाक असू शकते. भाजपाची पुन्हा केंद्रात सत्ता आली हे निकालाचे समर्थन होऊ शकत नाही.
कारण राज्यातली सत्ता गेल्यानंतर जनता स्थानिक स्वराज्य संस्थेतही नाकारू लागली आहे, हे जळजळीत सत्य आहे. अजूनही नेत्यांची अहंकाराची भाषा संपलेली नाही, आत्मचिंतनाऐवजी आम्हीच कसे पुढे आहोत हेच सांगण्याचा बालिशपणा केला जात आहे. २०१९ ला विधानसभेत सिंटींग आमदार महोदयांचे तिकीट कापण्यावरून जिल्ह्यातील भाजपात सुरु असलेले हे गटातटाचे राजकारण खूप खोलवर गेलेले आहे. आपल्याच मर्जीतील लोकांची जिल्हा संघटनेत पदाधिकारी पदी वर्णी लावणे याचा अर्थ भाजपात एकाधिकारशाहीचा उदय झाल्याचा संदेश देतो.
जिल्ह्यात भाजपातील हा प्रकार पाहून सर्वसामान्यांत भाजपाच्या शिस्तीची चर्चा रंगू लागली आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचा नेता आणि कार्यकर्ता हा स्वकेंद्रित झाला आहे. पक्ष मोठा की मी मोठा? असा विचार रुजू लागल्याने भाजपात ठिकठिकाणी प्रकार पाहायला मिळत आहे. पण हा दांगळो पाहून सर्वसामान्य नागरिक, तळमळीचा कार्यकर्ता आणि ज्यांनी भाजपा वाढवली पण सत्तेची फळे चाखायला ते उरले नाहीत, त्यांना निश्चितच वाटेल की, कुठे नेऊन ठेवला या लोकांनी भाजप?
…( टिप )…
विधानसभा निवडणुकीची चाहुल लागताच भाजप मधील काही आजी माजी नेत्यांनी विविध खाजगी टिव्ही व युटयुब चॅनलला मुलाखती दिल्या. त्या मुलाखतीच्या आधारावर चौफेर टीमने भाजपाला मानणाऱ्या मतदारांचा सर्व्हेकरुन आढावा घेतला असता, वरील प्रतिक्रिया वजा संदेश मिळाला.

