भंडारा | लाखांदूर तालुक्यातील विरली/खुर्द येथे ८ नोव्हेंबर रोजी घडलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता हत्याकांडाचे स्वरूप धारण केले आहे. या घटनेचा उलगडा करताना लाखांदूर पोलिसांनी गावचा पोलीस पाटील योगेश पांडुरंग राऊत यालाच मुख्य सूत्रधार म्हणून अटक केली आहे. पोलीस पाटलासह एकूण पाच आरोपींविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.
मुख्य सूत्रधार पोलीस पाटलासह ५ जणांवर गुन्हा
या घटनेतील मुख्य आरोपी योगेश पांडुरंग राऊत (वय ४३, पोलीस पाटील) असून, इतर आरोपी अजय जनार्धन मेश्राम (वय ३०), सौरभ आसाराम प्रधान (वय १९), रामेश्वर ठाकरे (वय २७) आणि लोकेश हरिदास ठाकरे (वय २६) – (सर्व रा. विरली खुर्द) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बुद्धिमान धनविजय (वय ३५) या तरुणाला आरोपींनी जबर मारहाण केली होती. ज्यामुळे त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी बुद्धिमानचा मृतदेह त्याच्या घरासमोर झोपलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर गावात ‘नैसर्गिक मृत्यू की हत्या?’ अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती.
संयुक्त तपासणीत सत्य उघड
लाखांदूर पोलीस, भंडारा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि श्वानपथक यांनी या संशयास्पद मृत्यूची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला होता. संयुक्त तपासणीत, बुद्धिमानचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. या संपूर्ण प्रकरणात पोलीस पाटील योगेश राऊत हाच मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले.
कठोर कलमांखाली गुन्हा दाखल
पाचही आरोपींविरोधात लाखांदूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), १८९(२), १८९(४), १९० तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी ॲक्ट) कलम ३(२)(५) (सुधारीत अधिनियम २०१५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र चर्चांना उधाण आले असून, गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि अप्पर पोलीस अधीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिदाम हे पुढील तपास करत आहेत.

