>>>>भंडारा चौफेर | संदीप नंदनवार
राजकारणात आता वैचारिक मूल्य, तत्वनिष्ठा, पक्षनिष्ठा, त्याग,निःस्वार्थ भावना या सर्व गोष्टी नावालाच राहिल्या आहेत. स्वःहित साधण्यासाठी व्यक्तीनिष्ठेतेलाच पक्षनिष्ठेचा मुलामा देऊन तत्वनिष्ठेच्या गप्पा शेतकरी पुत्र, भुमीपुत्र, विकास (महा) पुरुष सारख्या जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळी व काही कार्यकर्त्यांकडून जिल्ह्यात हाकल्या जात आहेत.
हेही वाचा : अखेर प्रतिक्षा संपली; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज वाजणार बिगुल
खरंतर राजकारण कोणत्याही काळातील असो वसीम बरलेवी यांचा शेर, “इस दौर-ए-सियासत का इतना सा फसाना है, बस्ती भी जलानी है और मातम भी मनाना है” राजकारण किती गढूळ किंवा नितळ असू शकते याची प्रचिती जिल्ह्यातील राजकिय नेत्यांच्या कार्यशैलीतून जनतेला दिसत आहे.
अर्धशतकापूर्वी दादा कोंडके हा अस्सल सोंगाड्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्यतून लोकप्रिय झाला होता. एका प्रसंगी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आभार मानताना दादा म्हणायचे, तुकोबांनी सांगून ठेवले आहे ‘फ्रेंड इन नीड, इज फ्रेंड इंडीड’ त्यावर सगळ्या प्रेक्षकवर्ग खळाळून हसत असे.
हेही वाचा : भाजपची पहिली यादी लवकरच जाहीर होणार
कोणी कधी दादांकडे त्याचा पुरावा मागितला नव्हता, की ते वाक्य प्रमाण मानून तसे हवाले दिले नव्हते. सोंगाड्या हसवण्यासाठी असे काही असंबंध्द बोलतो, हे सामान्य बुद्धीच्या प्रेक्षकांनाही कळत होते. योगायोगाने तेव्हा बुद्धिमान लोकांपाशी तितकी सामान्य बुद्धी शिल्लक होती, हे विशेष.
आज जिल्ह्यातील राजकीय वातावरणात शैक्षणिकदृष्ट्या बुद्धिमान असलेल्या लोकांपाशी तेवढी सामान्य बुद्धी शिल्लक राहिली नाही. आता तर विकासाला तिलांजली देऊन जिल्ह्यातील नेते राजकीय सोंगाड्याच्या स्वरूपात उदयाला आले आहेत. दादाच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयात नाही, पण राजकारणाच्या सारीपटावर स्वतःला राजकीय पुढारी समजून जनतेपुढे हे नेते सोंगाड्या म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रसिद्ध झाले आहेत.
हेही वाचा : भाजपच्या माजी आमदाराचे ‘सिमोल्लंघन’ ! चरण वाघमारे यांच्या हाती ‘तुतारी’
या नेत्यांना जिल्ह्यातील जातिवंत गावनेतेमंडळीची भक्तीही खूप भावली आहे. जिल्ह्यात जेवढे पक्ष पार्टी आहेत त्या सर्व पक्ष पार्टीच्या नेत्यांसोबत रसाळ गोमटी फळे चाखून, हे राजकीय सोंगाडे समाजसेवेचा आव, शेतकरी व समाजाचा उद्धारक म्हणून जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सोंगाड्या म्हणून अभिनय करण्यास कधीही तत्पर असतात.
सरडा मोसमाप्रमाणे आपला रंग बदलते असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. पण त्याच्याही पलिकडे सरड्याला मानवी भाषेत आणखी एक स्थान आहे. त्याची धाव कुंपणापर्यंत असेही म्हटले जाते. याचाही अनुभव जिल्ह्यातील जनतेला या राजकीय नेत्यांच्या सकाळी एका पक्षात तर रात्री दुसऱ्या पक्षात अशा पक्षीय कोलांटउड्यामुळे अनेकदा आला आहे.
आपल्या भूमिका, रंग बदलून, उलटे पवित्र घेणारे नेते जिल्ह्यावासियांना बघायला सातत्याने मिळत आहेत. प्रामुख्याने हे राजकीय नेते सत्तेसाछी हल्ली निष्ठावंतांनाही लाजवेल इतक्या वेगाने रंग बदलत असतात. मी समाजाप्रती, जनतेप्रती प्रामाणिक आहे. मला माझा किंवा माझ्या कुळाचा उद्धार करायचा नसून मला गोरगरीब जनतेची सेवा करायची आहे, असे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या या राजकीय नेत्यांना पाच वर्षांपूर्वी आपण कुठला सिद्धांत मांडला होतो आणि काय त्याचा फायदा जनतेला झाला होता याचे लवकरच विस्मरण झाले असते.
हे नेते जेव्हा विधानसभेच्या आखाड्यात उतरतील तेव्हा समाजाची कास धरून मी समाजसुधारक आहे या आविर्भावात बचत गटाच्या साह्यायाने हळदीकुंकू, स्वतःच्या चेल्याचपाट्यांना कामी लावून बाया-बापड्यांना साड्या वाटणे, तरुण लोकांना उमेदवाराच्या नावाचा टी-शर्ट देणे एवढे नटरंगासारखे राजकीय अभिनय नक्कीच करतील.
केवळ सत्तेसाठी व ठेकेदारीसाठी निवडणुकीच्या काळात मायबाप जनतेसमोर शरणागती पत्करणाऱ्या राजकीय नेत्यांची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारणाच्या रणकंदनात झालेली एन्ट्री चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे विविध राजकीय पक्षाच्या गावनेतेमंडळीच्या साथीने उमेदवारी मिळविण्याचा कुटील डाव आखला जात आहे.
जिल्ह्यातील नेत्यांची मंत्रायलातील सदस्य होण्याची स्वप्ने, महत्वाकांक्षा विधानसभा निवडणुकीत कितपत सत्यात उतरतात हे ही पाहण्यासारखे राहील.शेवटी राजकीय नेतेमंडळींना दादाच्या लोकप्रिय वगनाट्याचं शिर्षक “विच्छा माझी पुरी करा” असे आगामी निवडणुकीत जनतेसमोर म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही, हेही तेवढेच खरं आहे.

