>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
विधानसभेसाठीची राजकीय समीकरणे मांडली जाऊ लागली आहेत.मधल्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आगामी लढती अनिश्चिततेने भरलेल्या असणार आहेत. नेत्यांच्या पक्ष बदलांमुळे मतदार अजूनही संभ्रमात आहेत.
तुमसर विधानसभा मतदारसंघात ‘ आजी आमदार विरुद्ध माजी आमदार’ यांच्यातील राजकीय स्पर्धेचा थेट परिणाम येत्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. एकूणच, आगामी विधानसभा निवडणुकीत तुमसर मतदारसंघात एकतर्फी स्पर्धा नसेल, असे आजच्या घडीचे चित्र आहे.
हेही वाचा : चर्चा जिल्ह्याच्या राजकारणाची! “विच्छा माझी पुरी करा”
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एण्ट्री केल्याने जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार गट) लढणार की भाजपा, याबद्दल खलबते सुरू होती.
मात्र, भंडारा-गोंदिया हा राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. प्रफुल्ल पटेल यांचा गड असल्याने तुमसर विधानसभेची जागा महायुतीच्या कोट्यातून राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडेच असण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे यांना शह देण्यासाठी विरोधी पक्ष नेमकी कोणाला उमेदवारी देणार, याची स्पष्टता काही काळ अधांतरीच होती.
हेही वाचा : अखेर प्रतिक्षा संपली; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज वाजणार बिगुल
मात्र, भाजपाचे माजी आ. चरण वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ची तुतारी हाती घेतल्याने तुमसर-मोहाडीमध्ये ‘राष्ट्रवादीचे वाघमारे विरुद्ध राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे’ अशा लढतीची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
तुमसर हा गेल्या विधानसभा निवडणुकीत चर्चेतील मतदारसंघ ठरला होता. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या तुमसर मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे यांनी अपक्ष उमेदवार चरण वाघमारे यांचा ७,७३९ मतांनी पराभव केला होता. भाजपाचे प्रदीप पडोळे यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. राजू कारेमोरे यांना ८७,१९०, अपक्ष चरण वाघमारे यांना ७९,४९० तर भाजपाचे प्रदीप पडोळे यांना ३३४५७ मते मिळाली.
अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित
तुमसर विधानसभा मतदारसंघात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. धानाला बोनस, शेतकरी कर्जमाफी, धान खरेदी केंद्राचा घोटाळा, रेतीतस्करी हे कायमस्वरूपी प्रश्न आहेत. तर, आंतरराज्यीय बावनथडी धरणालगत असलेल्या शेतकऱ्यांचा सिंचन आणि पाण्याचा प्रश्न मोठा आहे. गेल्या २३ वर्षांपासून १५ पेक्षा गावांचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे.
हेही वाचा : भाजपची पहिली यादी लवकरच जाहीर होणार
विरोधक या प्रश्नांवरून नेहमीच आक्रमक दिसतात. तर, ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात असला तरी गेल्या पाच वर्षांत रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या नाहीत. त्यामुळे सीमावर्ती भागातील बेरोजगार तरुण दरवर्षी मोठ्या शहरांकडे जात असल्याचे दिसते.
तुमसर मतदारसंघात तुमसर व मोहाडी असे दोन तालुके येतात. तुमसर तालुक्यात ९७ ग्रामपंचायती असून १५६ गावे आहेत. तर, मोहाडी तालुक्यात ७८ ग्रामपंचायती असून १०८ गावे आहेत. आमदार असतानाही चरण वाघमारे यांना भाजपाने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. तुमसर मतदारसंघात १९८० पर्यंत काँग्रेसची सलग सत्ता होती.
सण १९९५ ते २००९ पर्यंत भाजपाची : वर्ष विजयी उमेदवार पक्ष
सण १९९५ – मधुकर कुकडे -भाजपा
सण १९९९ – मधुकर कुकडे -भाजपा
सण २००४ – मधुकर कुकडे -भाजपा
सण २००९ – अनिल बावनकर -काँग्रेस
सण २०१४ – चरण वाघमारे -भाजपा
सण २०१९ – राजू कारेमोरे -राष्ट्रवादी
अशी सत्ता राहिली. २००९ साली काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा उमेदवार पुन्हा तुमसर मतदारसंघातून निवडून आला. भारतीय जनता पक्षाचा गड समजल्या जाणाऱ्या तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे सण १९९५ ते २००९ पर्यंत भाजपा आमदार म्हणून मधुकर कुकडे यांनी सलग १५ वर्षे नेतृत्व केले.
मात्र, २००९ मध्ये कुकडे यांना काँग्रेसच्या अनिल बावनकर यांनी पराभूत केले. चरण वाघमारे यांची शेतकऱ्यांसाठी झटणारा नेता म्हणून ओळख आहे. तर, संघटना बांधणीच्या पातळीवर विद्यमान आमदार कारेमोरे हेही तुल्यबळ उमेदवार आहेत.

