>>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील चर्चेतील विधानसभा क्षेत्रांमध्ये अग्रगण्य असलेल्या (Sakoli Assembly) साकोली विधानसभेत यंदा निवडणूक तिहेरी लढतीची होणार आहे. काँग्रेसच्या तिकिटावर विद्यमान महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज (दि.29) ऑक्टोबर रोजी, आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर, भाजप तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे (Avinash Brahmankar) अविनाश ब्राह्मणकर यांनी देखील आपला अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा : नानांच्या विरोधात कोण गाजवणार मैदान? काँग्रेसचे एक पाऊल पुढे
भाजपमधून अन्य इच्छुक उमेदवारांच्या यादीत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुदे, माजी आमदार बाळा काशीवार, तसेच डॉ. सोमदत्त करंजेकर (Somdutt Karanjekar) यांचा समावेश होता. परंतु, भाजपकडून तिकीट न मिळाल्याने डॉ. सोमदत्त करंजेकर आणि माजी आमदार बाळा काशीवार यांनी एकत्र येऊन स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, ज्यामुळे साकोली विधानसभेत तिहेरी स्पर्धा रंगणार आहे. बाळा काशीवार यांच्या नेतृत्वाखाली (Somdutt Karanjekar) डॉ. करंजेकर निवडणूक लढवणार आहेत.
प्रचारासाठी अवघे दहा दिवस असल्याने साकोलीच्या राजकीय वातावरणात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेसचे (Nana Patole) नाना पटोले, भाजपचे अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर, आणि बाळा काशीवार यांच्या नेतृत्वाखाली लढणारे डॉ. करंजेकर हे तीनही उमेदवार मतदारांच्या मनाची पकड घेण्यासाठी अंतिम टप्प्यात जोरदार तयारी करत आहेत. साकोलीतील या तिहेरी लढतीत कोणता उमेदवार मतदारांच्या विश्वासाला पात्र ठरेल, विकासकामांच्या मुद्द्यावर कोण बाजी मारेल, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

