>>>चौफेर प्रतिनिधी | भंडारा
भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीने राजकीय वातावरणात खळबळ उडवली आहे. या निवडणुकीत दोन्ही परस्परविरोधी गटांना प्रत्येकी सहा-सहा संचालकपदे मिळाल्याने सत्तेचा तोल साधण्यासाठी एका संचालकाच्या पाठिंब्याची गरज आहे. यामुळे दोन्ही पॅनल्समध्ये तीव्र रस्सीखेच सुरू झाली आहे.यासोबतच जिल्ह्यातील राजकीय समीकरणे नव्याने आकार घेण्याची शक्यता आहे.
शनिवारी, 28 जून 2025 रोजी झालेल्या या निवडणुकीत 12 संचालकपदांसाठी तब्बल 25 उमेदवार मैदानात उतरले होते. जिल्ह्यातील 169 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते, कारण काँग्रेसचे आमदार नाना पटोले आणि शिवसेना (शिंदे गट) आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी युती करत या निवडणुकीला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला होता. त्यामुळे ही लढत केवळ दूध संघापुरती मर्यादित न राहता राजकीय प्रभावाची झलक दाखवणारी ठरली.
या निवडणुकीत काँग्रेसप्रणित शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी यांनी केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित सहकार विकास पॅनलचे नेतृत्व माजी अध्यक्ष विलास काटेखाये यांच्याकडे होते. निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
रामलाल चौधरी यांना पराभवाला सामोरे जावे लागले, तर विलास काटेखाये यांनी विजय मिळवला. मात्र, दोन्ही गटांना प्रत्येकी सहा संचालकपदे मिळाल्याने सत्तास्थापनेचा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. आता एका संचालकाच्या पाठिंब्यावर सत्तेचा निर्णय अवलंबून आहे, आणि यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
ही निवडणूक आणि त्यानंतरचा सत्तेचा तिढा यामुळे भंडारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी रणनीती आखत असून, पुढील काही दिवसांत सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या निवडणुकीचा परिणाम केवळ दूध संघाच्या कारभारावरच नव्हे, तर स्थानिक राजकारणावरही दीर्घकालीन प्रभाव टाकण्याची शक्यता आहे.
विजयी उमेदवारांची यादी
| लाखनी तालुका | शरद कोरे
| साकोली तालुका | मनोहर लंजे
| लाखांदूर तालुका | विलास शेंडे
| मोहाडी तालुका | नरेश पोटफोडे
| पवनी तालुका | विलास काटेखाये
| भंडारा तालुका | हितेश सेलोकर
| तुमसर तालुका | मुकुंदा आगाशे
| इतर मागासवर्ग | विवेक पडोळे
| भटक्या विमुक्त/विशेष मागास प्रवर्ग | आशिष पातरे
| अनुसूचित जाती/जमाती राखीव | आशिष मेश्राम
| महिला प्रतिनिधी | अस्मिता शहारे
| महिला प्रतिनिधी | अनिता तितिरमारे

