>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी तिकीट मिळवण्यास इच्छुक असलेल्यांनी पक्षांवर दबावतंत्र अवलंबण्यास सुरुवात केली आहे. तिकीट वाटपात योग्य निर्णय न घेतल्यास त्याचा मोठा राजकीय फटका बसू शकतो, याची कल्पना असल्याने पक्षश्रेष्ठी ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत गेले आहेत.
‘नारज’ इच्छुक ठरतील ‘किंगमेकर’?
जिल्ह्यात यंदा भंडारा ३५, तुमसर २५, साकोली २०, पवनी २० सदस्यसंख्या असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणूका होणार असून, जवळपास प्रत्येक प्रभागात एका जागेसाठी किमान ३ ते ५ निष्ठावान दावेदार आहेत. तर, नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने, येथे तर इच्छुकांनी ‘रिंगण’ च तयार केले आहे. जुन्या निष्ठावंतांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यास, जुने कार्यकर्ते ‘बंडखोरी’ करून अपक्ष उभे राहू शकतात.
हेही वाचा | जिल्ह्यात ४ नगरपरिषदांवर बिगुल, २ डिसेंबरला मतदान
अशा बंडखोर उमेदवारांना मिळणारी मते, प्रमुख पक्षाचे ‘गणित’ बिघडवून सत्ता समीकरणात मोठा ‘फेरबदल’ करू शकतात. अनेक ठिकाणी प्रमुख पक्षांमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याने, तिकीटवाटपावरून झालेल्या ‘नाराजी’चा फायदा तिसरा पक्ष किंवा अपक्ष उमेदवार घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. ‘नाराज’ इच्छुकच ‘किंगमेकर’ ठरतील, अशी भीती नेत्यांना सतावत आहे.
पक्षश्रेष्ठींसमोर ‘यशाचा फॉर्म्युला’ साधण्याचे आव्हान
तिकीट वाटपात जात, अनुभव, पक्षातील निष्ठा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘निवडून येण्याची क्षमता’ या चार कसोट्यांवर इच्छुकांना पार पाडावे लागणार आहे. निवडणूक ही जनतेच्या कौलावर अवलंबून असते, पण तत्पूर्वी पक्षांतर्गत ‘समतोल’ साधणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी नाराज नेत्यांना भविष्यातील ‘पदे’ किंवा अन्य जबाबदाऱ्यांचे आश्वासन देण्यावर सध्या भर दिला जात आहे,” अशी माहिती एका उच्चपदस्थ सूत्राने दिली. पक्षश्रेष्ठी ‘नारजांना’ कशा प्रकारे सांभाळतात आणि शेवटच्या क्षणी कोणते ‘धक्कादायक’ निर्णय घेतात, यावरच जिल्यातील नगरपरिषदेतील निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल १० ते १७ नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची मुदत २१ नोव्हेंबर
मतदान – २ डिसेंबर
मतमोजणी – ३ डिसेंबर

