भंडारा : लाखनी वनपरिक्षेत्रातील मुरमाडी/तुप येथील डोंगरगाव/सा. गावात डोंगरगाव ते रामपूरी पांदन रोडावरील पाण्याच्या पाईपमध्ये एक बिबट्या अडकल्याची घटना घडली. गावकऱ्यांनी याबाबत तात्काळ वनरक्षकांना माहिती दिली. माहिती मिळताच लाखनी वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून सुरक्षित राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच, भंडारा उपवनसंरक्षक आणि साकोली सहाय्यक वनसंरक्षकांना याबाबत कळवण्यात आले.
बचाव दलाची तत्पर कारवाई
भंडारा वनविभागाच्या वन्यप्राणी बचाव दलाला (शिघ्र कृती दल) तात्काळ पाचारण करण्यात आले. बचाव दलाने घटनास्थळाची पाहणी करून पाईपाच्या एका बाजूस पिंजरा लावला आणि बिबट्याला यशस्वीपणे जेरबंद केले. पशुधन विकास अधिकाऱ्यांनी बिबट्याची शारीरिक तपासणी केली असता, तो पूर्णपणे सुदृढ असल्याचे आढळले. त्यानंतर बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
सामूहिक प्रयत्नांचे यश
हे बचाव कार्य भंडारा उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि साकोली व भंडारा सहाय्यक वनसंरक्षक, लाखनी वनपरिक्षेत्र अधिकारी, जीवशास्त्रज्ञ, वाहनचालक आणि भंडारा वनविभागाच्या बचाव दलाने यशस्वीपणे पार पाडले. याशिवाय, लाखनी, उमरझरी, जांभळी येथील क्षेत्र सहाय्यक, जंकास लाखनीचे वनपाल, वनरक्षक, वनकर्मचारी, गावकरी, सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या सहकार्याने हे ऑपरेशन यशस्वी झाले.