>>>अतुल नागदेवे | लाखनी
१२ सदस्यीय येथील पंचायत समितीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसले तरी सभापती आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती महिलेकरिता सभापती पद आरक्षित झाल्याने कनेरी/दगडी गणातून निर्वाचित झालेल्या काँग्रेसच्या एकमेव पंचायत समिती सदस्या अश्विनी रुपवसंत मोहतुरे याची निवड निश्चित मानली जात असली तरी उपसभापती पद काँग्रेस की भाजपा कडे जाते. हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
आपलाच उपसभापती व्हावा या करिता दोन्ही पक्ष प्रयत्नशील असून या निमित्त शहकाटशहाचे राजकारण होणार असले तरी अपक्ष पंचायत समिती सदस्य रवींद्र(दादू) खोब्रागडे यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार असल्यामुळे उपसभापती पदी कुणाची वर्णी लागणार ? या बाबद राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून १९९९ ला लाखनी तालुका निर्मितीची घोषणा झाली असली तरी महाराष्ट्र दिनी १ मे २००० रोजी तहसील कार्यालय उत्तर बूनियादी शाळेत तर पंचायत समिती कार्यालयास शासकीय गुरांच्या दवाखान्यात सुरुवात करण्यात आली. १ नगर पंचायत व ७१ ग्रामपंचायतीत १०४ गावे समाविष्ट असून ९४ लोकवस्तीची तर १० गावे रिठी आहेत. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ३४ हजार २४८.५८ हेक्टर आहे. या पंचायत समितीची प्रथम निवडणूक जून २००० मध्ये घेण्यात आली.
प्रथम सभापती पदाचा मान भाजपा च्या पुष्पाताई गिरेपुंजे यांना मिळाला. पंचायत समिती लाखनी ची ४थी पंचवार्षिक नोव्हेंबर २०२१ मध्ये समाप्त झाली असली तरी नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षण घोळामुळे डिसेंबर २०२१ व जानेवारी २०२२ मध्ये पाचव्या पंचवार्षिकसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक घेण्यात आली. पण मे २०२२ मध्ये सभापती-उपसभापती ची निवडणूक पार पडली. त्यात ईश्वर चिठ्ठीने काँग्रेसच्या प्रणाली विजय सार्वे तर उपसभापती पदी भाजपा चे गिरीश बावनकुळे यांची वर्णी लागली.
१२ सदस्यीय लाखनी पंचायत समितीत केसलवाडा/वाघ, गडेगाव, मुरमाडी/सावरी, पिंपळगाव/सडक, मुरमाडी/तूप, कोलारी, पालांदूर, खराशी, पोहरा, कनेरी/दगडी, लाखोरी, सालेभाटा ह्या १२ गणांचा समावेश होत असून डिसेंबर २०२१ व जानेवारी २०२२ मध्ये पार पडलेल्या पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत विकास वासनिक, सुनील बांते, प्रणाली सार्वे, योगिता झलके, मनीषा हलमारे, अश्विनी मोहतुरे असे काँग्रेस चे ६ तर गिरीश बावनकुळे, सुरेश झंझाड, किशोर मडावी, शारदा मते, सविता राघोर्ते असे भाजपा चे ५ आणि अपक्ष रवींद्र(दादू) खोब्रागडे असे पक्षीय बलाबल असून कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.
पंचायत समितीच्या ५व्या पंचवार्षिक योजनेचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर केले. त्यात लाखनी पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जाती महीलेसाठी आरक्षित असल्यामुळे काँग्रेस च्या एकमेव पंचायत समिती सदस्या अश्विनी रूपवसंत मोहतूरे यांची वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे.
सभापती-उपसभापती निवडणूक २ दिवसावर येऊन ठेपली असताना काँग्रेस व भाजपा ने उपसभापती पदी कुणाची वर्णी लागणार असल्याचे पत्ते उघड केले नसले तरी काँग्रेस कडून सुनील बांते व मनीषा हलमारे तर भाजपा कडून सुरेश झंझाड, गिरीश बावनकुळे व किशोर मडावी उपसभापती पदासाठी इच्छुक असल्याचे विश्वसनीय वृत्त असून पक्षात फूट पडू नये म्हणून पक्षश्रेष्ठींनी उपसभापती पदी नाव निश्चित केले नसल्याचे समजते.
तरीही पक्षीय बलाबल लक्षात घेता काँग्रेस व भाजपाला उपसभापती पदाकरिता अपक्ष रवींद्र (दादू) खोब्रागडे यांची गरज भासणार आहे. त्यामुळे त्यांनाही राजयोग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण काँग्रेस ने दादू खोब्रागडे यांची मदत घेतली नाही तर ते भाजपा ला मदत करून दोन्ही पक्ष समसमान होऊ शकतात. असे झाल्यास ईश्वरचिठ्ठी शिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे सभापती ठरले पण उपसभापती पदी कुणाची वर्णी लागणार ? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.