>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग येत असताना जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी जोर धरू लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रभाग रचना आणि आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारांची निवड आणि गठबंधनांवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, साकोली आणि पवनी या चार नगरपरिषदांमध्ये प्रभागनिहाय राजकीय हलचल वाढली आहे. महिला आरक्षणामुळे अनेक जागांवर नवीन चेहरे दिसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पक्षांत गुप्त बैठका, जागा वाटपावरून तणाव
महायुती (भाजप-शिवसेना-एनसीपी) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस-शिवसेना-युती-एनसीपी) दोन्ही बाजूंनी गठबंधन कायम राहील की नाही? यावर संशय व्यक्त केला जात आहे.आरक्षणामुळे अनेक पारंपरिक उमेदवारांचे धोरण बदलले आहे. गठबंधन तुटले तर मतांचा बंटवारा होईल व अपक्षांना फायदा होईल. राजकीय नेते पक्षप्रमुखांशी संपर्क साधत कार्यकर्त्यांशी चर्चा करत जनसंपर्क अभियान चालवत आहेत.
सहकार क्षेत्रातील अलीकडील निवडणुकांप्रमाणे (दूध संघ आणि मध्यवर्ती बँक) राजकारणाचा प्रभाव दिसून येत आहे. नाना पटोले आणि नरेंद्र भोंडेकर यांसारख्या नेत्यांनी एकत्र येऊन बाजी मारली होती.प्रभारी राज याचा जनतेने अनुभव घेतला आहे. आता कोणाचा करिश्मा चालेल, कोण बाजी मारेल हे आगामी दिवसच सांगतील. पण हे सारे उमेदवार सरस कसे दिसतील यावरच पक्षांचे लक्ष आहे.
युती, आघाडी होणार की… ‘एकला चलो’चा नारा?
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सत्ताधारी आमदारांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कॉर्नर बैठकांचा जोर वाढवला आहे. मात्र, अनेक वर्षांनंतर सत्तेच्या खुर्चीवर बसण्याचा योग येणार असल्याने स्थानिक पातळीवर बहुतांश नेत्यांच्या तोंडून ‘एकला चलो रे…’ ची भाषा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे युती आणि आघाडीचे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही.एकंदरीत, भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीत ‘आयाराम-गयाराम’ ‘जुगाड’ गणिताचा थरार पाहायला मिळणार असून, अंतिम क्षणापर्यंत सत्तेच्या चाव्या नेमक्या कुणाच्या हातात जातील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

