>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
भंडारा : जिल्ह्यातील शिवसेना (शिंदे गट) आमदार नरेंद्र भोंडेकर आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. महायुतीतील या दोन नेत्यांमधील संघर्ष पक्षांतर्गत कार्यकर्त्यांच्या पक्षांतरामुळे आणखी तीव्र झाला आहे. परिणय फुके यांनी भोंडेकरांवर “NCP च्या जोरावर निवडून आले” अशी खोचक टीका करीत वादाला नवे वळण दिले आहे.
पक्षांतराने वादाला तोंड
काही दिवसांपूर्वी शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनी भाजपचे पद्माकर बावनकर, बाळा शिवणकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले होते. प्रत्युत्तरादाखल, परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे किशोर चौधरी, प्रकाशराणा मेश्राम यांनी भाजपात प्रवेश देण्यात आला. या पक्षांतराच्या खेळाने भंडारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
फुके यांचे टीकास्त्र
फुके यांनी भोंडेकरांवर टीका करताना म्हटले, “NCP च्या जोरावर भोंडेकर निवडून आलेत, हे विसरू नये.” हा टोला भोंडेकरांच्या निवडणूक यशाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसला देत शिवसेना आणि NCP मधील तणाव उघड करणारा ठरला. विशेषतः, भंडारा येथील एका कार्यक्रमात काँग्रेस नेते आ. नाना पटोले आणि भोंडेकर एकाच मंचावर दिसल्याने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
महायुतीतील तणाव उघड
या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि नाराजी चव्हाट्यावर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. फुके आणि भोंडेकर यांच्यातील हा संघर्ष महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
स्थानिक राजकारणावर परिणाम
भंडारा जिल्ह्यातील हा वाद केवळ पक्षांतर्गतच नाही, तर स्थानिक पातळीवरही राजकीय समीकरणे बदलवण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांचे पक्षांतर आणि नेत्यांमधील शाब्दिक चकमकी यामुळे सामान्य जनतेमध्येही संभ्रम निर्माण होत आहे.
भोंडेकरांचे प्रत्युत्तर
शिवसेना हे नेते निर्माण करणारी संस्था आहे. जिल्ह्यात भाजपकडे नेते नसल्यामुळे याला-त्याला ओढत आहे. मी फडणवीसाचा सन्मान करतो. परिणय फुके ज्या चुका करीत आहेत, त्या करून नये. हा भंडारा आहे हे विसरू नये.