>>>>भंडारा चौफेर | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ छोटा राहिला, पण या अल्पकाळातही त्यांनी दूरगामी विचार करून निर्णय घेतले. विशेषतः राज्यभरात त्यांनी सिंचनाच्या क्षेत्रात भरीव कामे केली.
सर्वकाही सुरळीत सुरू असताना विरोधी पक्ष आणि त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांच्या हाती एक प्रकरण लागले. वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची म्हणजे एमडीची परीक्षा दिलेल्या आपल्या कन्येचे दोन गुण वाढवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. न्यायालयानेही तसा ठपका त्यांच्यावर ठेवला. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते. महाराष्ट्र विधानभवनाचे रखडलेले काम निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखालीच पूर्ण झाले होते. डॉ. निलंगकेर यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.
मात्र, स्वातंत्र्य सैनिक म्हणून मिळणारे मानधन त्यांनी कधीही स्वीकारले नाही. डॉ. निलंगेकर यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री वगळता अन्य कोणत्याही मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी कालावधी मिळाला. ते नऊ महिने आणि तीन दिवस मुख्यमंत्रिपदावर राहिले. चारित्र्यसंपन्न नेता, अशी त्यांची ख्याती होती. मात्र, वैद्यकीयच्या पदव्युत्तर परीक्षेत कन्या चंद्रकला डवले यांचे दोन गुण वाढवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.
मुंबई विद्यापीठातर्फे एमडी परीक्षा घेण्यात आली होतो. डॉ. निलंगेकर यांच्या कन्या चंद्रकला यांनी ती परीक्षा दिली होती. यापूर्वी चंद्रकला यांनी तीनवेळा परीक्षा दिली होती. मात्र, त्या उत्तीर्ण होऊ शकल्या नव्हत्या. मात्र, चंद्रकला गांनी चौथ्यांदा परीक्षा दिली. त्यावेळी त्यांचे वडील हे मुख्यमंत्री होते. त्या प्रयत्नात चंद्रकला एमडी परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
मात्र, मुख्यमंत्री असलेल्या वडिलांनी पदाचा गैरवापर करून मुलीचे दोन गुण वाढवल्याचा आरोप झाला होता. हे प्रकरण न्यायलायात गेले. न्यायालयाने या प्रकरणात त्यांच्यावर ताशेरे ओढले. त्यामुळे डॉ. निलंगेकर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. कालांतराने या प्रकरणात त्यांना क्लीन चिट मिळाली. असे सांगितले जाते की, मुख्यमंत्री बनल्यावर निलंगकेर यांनी कामांचा धडाका लावला होता. त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत कोणत्या भागात काय समस्या आहेत, याची पाहणी करून त्यावर काम सुरू केले होते.
त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढीला लागली होती.
परिणामी, त्यांचे पक्षांतर्गत विरोधक आणि विरोधी पक्षांतील नेतेही सावध झाले होते. ते कुठे अडकतात का, यासाठी विरोधक टपूनच बसलेले होते. मात्र, निलंगेकर हे कोणत्याही गैरव्यवहारात अडकत नव्हते. त्याचवेळी निलंगेकरांनी कन्येचे गुण वाढवल्याचे कथित प्रकरण त्यांच्या विरोधकांच्या हाती लागले आणि गदारोळ सुरू झाला.
डॉ. निलंगेकर यांची पक्षनिष्ठाही वादातीत होती. पडझडांच्या काळातही त्यांनी पक्ष बदलला नव्हता. निलंगा विधानसभा मतदारसंघातून ते आठवेळा विजयी झाले होते. मराठवाड्याच्या विकासाशी संबंधित विषयावर शोधप्रबंध लिहीत डॉक्टरेट मिळवणारे ते महाराष्ट्राचे पहिलेच मुख्यमंत्री ठरले.