>>>>> रवी भोंगाने
साकोली प्रतिनिधी | नुकतीच अनंत चतुर्दशी पार पडली. लहान,थोर, आबालवृद्ध या सर्वांनीच गणपती बाप्पांची सलग दहा दिवस मनोभावे आराधना व सेवा केली. त्यानंतरच आपल्या आवडत्या गणरायाला “गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या” अशी आळवणी, विनवणी आणि आर्त साद देऊन भावपूर्ण निरोप दिला.
या सर्वांमध्ये सर्वसामान्य नागरिक तर होतेच होते पण यावेळी राजकीय प्रतिनिधींचा गणपती बाप्पांच्या दर्शनाकडे कल अधिक दिसून आला.तसा तो नेहमीच असतो. कारण आपल्याकडे दिवाळी दरम्यान महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका घेण्यात येतात. त्याच्या एक दीड महिन्यापूर्वी श्री गणरायाचे आगमन दरवर्षीच होत असते.
परंतु यावेळी साकोली विधानसभा क्षेत्रातील बदलती राजकीय समीकरणे कुणाचा पाडाव करणार?आणि ही गणिते कुणासाठी बेभरवशाची ठरणार याचे गणित सोडविणे कठीण जाणार आहे.नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दिवाळी आहे.त्यामुळे राजकीय उमेदवारांच्या मागे फटाके केव्हा लावायचे आणि त्यांना फोडायला केव्हा लावायचे?
हा निर्णय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून लवकरच समोर येईल. असे असले तरी निवडणुक यंत्रणा कामाला लागलेली आहे. नव्हे ती सज्जच असते. त्यांच्यासाठी निवडणुक ही गोष्ट नेहमीची ठरलेली आहे.परंतु या ठिकाणी एक गोष्ट सांगणे आवश्यक ठरते ती म्हणजे १० दिवसीय गणेशोत्सवा दरम्यान, गणपत्ती बाप्पाला आमदार होण्याचे साकडे सर्व भावी उमेदवारांनी घातले.इतकेच नव्हे तर अनेक भावी उमेदवारांनी आपल्या मतदार क्षेत्रात आपल्या बाजूने काय कल असेल याचा सर्वे करण्यासाठी एक यंत्रणाच उभी केली.
काही उमेदवारांनी गणेशोत्सवाचे निमित्त साधून गावोगावी जाऊन प्रत्यक्षात मतदारांना आणि कार्यकर्त्यांना भेटणे पसंत केले.आतापासून हळूहळू का होईना राजकीय शीत युद्ध साकोली विधानसभा क्षेत्रात सुरू झालेले आहे. एकमेकांच्या विरोधी उमेदवारांच्या उखाड्या पाखाड्याही काढणे सुरू झाले आहे.एकमेकांच्या पायात तंगड्या टाकून आडवे करणे तेवढे सुरू व्हायचे आहे. निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाली की, पायात तंगडी टाकून राजकीय लंगडीचा खेळ सुरू होईल.
साकोली विधानसभा क्षेत्रात लाखांदूर तालुक्यात इतर दोन तालुक्याच्या तुलनेत मतदार संख्या कमी आहे.मात्र वेळोवेळी विधानसभेच्या आणि लोकसभा निवडणुकीच्या विजयात लाखांदूर तालुक्यातील मतदार शिल्पकार राहिलेले आहेत.गत लोकसभा निवडणुकीतही खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या विजयात साकोली विधानसभा क्षेत्राच्या मतदारांचा फार मोठा प्रभाव राहिलेला आहे.त्यामुळे भावी उमेदवारासाठी इतर तालुक्याबरोबरच लाखांदूर तालुक्यासाठी प्रचंड कसरत करावी लागणार आहे.
कारण हा गड आ.नाना पटोले यांचा मानला जातो.शेवटी हे राजकारण आहे. आपल्या परीने सर्वच राजकीय पक्ष डावपेच खेळत असतात. एक प्रकारे हा एक शतरंजचा खेळ आहे.आपल्या मनासारखा प्रत्येक डाव आपल्या बाजूने पडेल असे नाही.शेवटी प्रेम,युद्ध आणि राजकारण यात सबकुछ जायज असे म्हटले जाते.त्यामुळे जो जिता वही सिकंदर.

