>>>भंडारा चौफेर | अतुल नागदेवे
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा नवनिर्वाचित आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली लाखनी येथील कच्ची मेमन सभागृहात काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीत झालेला अल्पमताने विजय तसेच महाराष्ट्रात पराभवाच्या पार्श्वभूमीवर हा विचार मंथन मेळावा आयोजित करण्यात आला होता. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह पक्षाची रणनिती आणि इतर मुद्द्यांवर या मेळाव्यात चर्चा झाली. या मेळाव्याला साकोली विधानसभेतील काँग्रेस पदाधिकारी बहुसंख्येने संख्येने हजर होते.
हेही वाचा : निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाची स्वाक्षरी मोहीम ; आ. पटोले यांची माहिती
विधानसभा निवडणुकीत झालेली कामगिरी पाहता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे म्हणत नाना पटोले यांनी आगामी काळात मोठ्या बदलांविषयी सूचक वक्तव्य केले. पक्ष संघटनेत अपेक्षित बदल, ईव्हीएमवरील भूमिका अशा काही विषयांवर मार्गदर्शन या, मेळाव्याप्रसंगी पटोले यांनी केले.
आयोगाने बूथ कॅपचरिंग केली : आ. पटोले
लोकशाही वाचविणे काँग्रेसचा एकमात्र उद्देश असून, येत्या काळात बैलट पेपरवर मतदान झालेच पाहिजे, त्याकरीता मोठे जनआंदोलन उभारण्याची तयारी काँग्रेसची आहे. यावेळी निवडणूक आयोगाने बूथ कॅपचरिंग केली. त्यामुळे राज्याचे चित्र बदलले गेले. राज्यात लागलेला निकाल अर्थातच अपेक्षित नव्हता विधानसभेचा धक्कादायक निकाल लागताच अक्षरशः डोळ्यात पाणी आले. लाखनीत कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी नाना पटोले, म्हणाले.
अध्यक्षस्थानी आमदार नाना पटोले, प्रमुख उपस्थितांमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, उपाध्यक्ष ॲड. शफी लंध्दानी, अशोक चोले, मजूर संघाचे अध्यक्ष भरत खंडाईत, राज्य कार्यकारिणी सदस्य आकाश कोरे, जिल्हा सेवादल अध्यक्ष कैलास भगत, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष योगराज झलके, सभापती प्रणाली सार्वे, शिवसेनेचे लवकुश निर्वाण, युवक आघाडी अध्यक्ष यशवंत खेडीकर आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमांना माल्यार्पण करून दीप प्रज्वलनाने विचार मंथन मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.
पुढील निवडणुका डी-लिमिटेशनच्या आधारे होतील?
नवनिर्वाचित आमदार नाना पटोले यांचा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करतांना पुढे आमदार नाना पटोले यांनी सांगितले की २०२९ च्या निवडणुका डी-लिमिटेशनच्या आधारे होतील. मुळात ही निवडणूक मी लढली नाही तर, सामान्य पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक लढली, जर का, स्वतः या ठिकाणी राहिलो असतो तर, कदाचित १५ हजाराच्या मताधिक्याने निवडून आलो असतो. माझेकडे महाराष्ट्राची धुरा होती त्यामुळे स्वतःच्या मतदारसंघात जास्त वेळ देता आला नाही.
या निवडणुकीत लाखनी, साकोली, आणि लाखांदूर तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीने ही निवडणूक जिंकली. असेही, नाना पटोले म्हणाले. काँग्रेसमध्ये प्रदेश पातळीसह जिल्हा, तालुका आणि त्याखालील सर्व पातळीवर मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे.
सोबतच काँग्रेस पक्षाच्या सर्व शाखा महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस अगदी स्थानिक पातळीपासून ते संघटनेतील सर्वात मोठ्या पदापर्यंत मोठ्या ताकदीने लढण्याची गरज आहे. मेळाव्याप्रसंगी, साकोली विधानसभेतील बहुसंख्येने पदाधिकारी हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, ऍड.शफीभाई लंद्दानी, संचालन धनपाल बोपचे, तर आभार योगेश झलके यांनी मानले.