>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात लगतच्या गोंदिया जिल्ह्यातील तीन मतदार संघात उमेदवारी जाहीर केली असली तरी भंडारा जिल्ह्यातील हक्काच्या साकोली विधानसभा मतदारसंघाचा मात्र या यादीमध्ये स्थान नाही. त्यामुळे साकोलीचा जागा महायुतीतून कुणाच्या वाट्याला जाणार याबाबत सस्पेन्स वाढला आहे.
हेही वाचा : निवडणुका, की पैसे कमावण्याचा हंगाम ? ‘नोट फॉर व्होट’ चा भस्मासूर गाडायला हवा
विशेषतः साकोली विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान आमदार नाना पटोले यांचा गृह मतदारसंघ असल्यामुळे राज्याचे याकडे लक्ष लागले आहे. असे असले तरी सर्व्हेत साकोलीची जागा भाजप राखू शकणार नाहीत म्हणून महायुतीकडून दादांच्या राष्ट्रवादीला जागा सोडली जात आहे, असे भाजपच्या जिल्ह्यातील एका बड्यानेत्याने आपल्या जनता दरबारात म्हटले असल्याचे पक्षातील नेतेमंडळींनी नाव न जाहिर करण्याच्या अटीवर सांगितले आहे.
विशेषतः भंडारा जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही भंडारा, तुमसर व साकोली मतदारसंघात कमळ फुलले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या जिल्ह्यातील एका बड्यानेत्याने स्वतःचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी २०१४ मध्ये आमदार म्हणून निवडून आलेल्या तीनही लोकांचा २०१९ मध्ये उमेदवार म्हणून वर्णी न लागू देता पत्ता साफ केला. २०२४ च्या निवडणुकीतही तोच कित्ता गिरविला जात असल्याने एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेला भंडारा जिल्हा भाजपमुक्त होत असल्याचे मत जिल्ह्यातील भाजपचे नेतेमंडळी करू लागले आहेत.
हेही वाचा : सरपंच संघटनेचा जिल्हा अध्यक्ष उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?
हक्काची साकोली विधानसभा सीट जातीचे समीकरण पुढे करून महायुतीतून दादांच्या राष्ट्रवादीला देण्याचे ठरले असल्याचे भाजपच्या त्या बड्या नेत्याकडून बोलले जात आहे. मात्र, दादांच्या राष्ट्रवादीला साकोली विधानसभेत सारस्वस्य नसल्याचे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगिलले आहे. विशेष म्हणजे भाजपचा तो बडा नेता स्वतःचे वर्चस्व राखण्यासाठी असे नरेटिव्ह पसरवत असल्याचे खुद्द राष्ट्रवादीच्याच नेत्याने सांगिलले आहे.
भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघांपैकी साकोली या मतदार संघामध्ये महायुतीकडून भाजपला उमेदवारी पक्की असल्याचे मानले जात होते. त्यामुळे रविवारी जाहिर झालेल्या पहिल्या यादीत किमान साकोलीला स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती.
मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी म्हणून भाजपचा एक बडा नेता पुढाकार घेत असल्याने येथील घोषणा लांबणीवर पडल्याची माहिती आहे. साकोली मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपच्या एका विद्यमान लोकप्रतिनिधीने जाणीवपूर्वक या भागातून राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली तीव्र केल्या असल्याचीही चर्चा आहे.
इच्छुक भाजपसाठी एकनिष्ठ
साकोली विधानसभा मतदारसंघात भाजपकडून महायुतीच्या उमेदवारीबाबत विविध नावांची चर्चा आहे. यापैकी कुणा एकालाही उमेदवारी मिळाल्यास एकनिष्ठेने काम करण्याचे धाडस इच्छूकांनी दाखविले आहे. मात्र, बड्या नेत्यानी स्वतःच्या वर्चस्वासाठी साकोलीचा जागा महयुतीच्या कोट्यातून राष्ट्रवादीला झाली असल्याचे सांगितले, असे आता भाजपचे कार्यकर्तेच म्हणू लागले आहेत.
दरम्यान, याच गोष्टीचा उलगडा करण्यासाठी साकोली मतदार संघातील भाजप नेतेमंडळी व पदाधिकारी यांनी रविवारी नागपूरातील वाड्यावर भेट दिली. यावेळी ही मंडळी राज्यातील पक्ष मुखियालाही भेटली. मात्र, यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्याचे सांगण्यात आल्याची माहिती आहे.
भाजपमध्येच बंडखोरी होण्याची शक्यता ?
आजी माजी लोकप्रतिनिधींनी आपल्या राजकीय कार्यकाळात केलेल्या विविध विकासकामांसोबतच सामाजिक आणि जातीय धोरणांबाबत निवडणुकीतील विजयाबाबत धाकधूक असल्याची चर्चा आहे. २५ विरूध्द ५ वर्षाचा कार्यकाळ यावर मतदारसंघात काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियामध्ये सोशल वॉर सुरु आहे.
मात्र, कोणत्याही एका धोरणावर अवलंबून राहून साकोली मतदारसंघातून निवडणूक जिंकणे दोन्ही पक्षाला सध्यातरी कठीणच आहे. त्यामुळे या भागात महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, महायुतीकडून राष्ट्रवादीची (अजित पवार गट) उमेदवारी जाहीर झाल्यास भाजपमध्येच बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नानांच्या निवडणुकीतील पराभवाच्या आव्हानात भाजप अडकण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

