भंडारा : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या संकल्पनेतून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी प्रोत्साहन देणारा “दिशा प्रकल्प” संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाला आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश खेड्यासह शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना येणाऱ्या अडचणी दूर करणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील १७ तर लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थ महाविद्यालयात १०० गुणांची चाचणी परीक्षा आयोजित करण्यात आली. या परीक्षेतून भंडारा जिल्ह्यातील १००० होतकरू विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या निवडक विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊन त्यांना महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांतील पदांवर निवड होण्यासाठी तयार केले जाईल. यात यशस्वी विद्यार्थ्यांचे यश इतर गावांतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
दिशा प्रकल्पा अंतर्गत युथ फाऊंडेशनच्या सहकार्याने एक यूट्यूब चॅनल देखील सुरू करण्यात आले आहे. या चॅनलद्वारे मराठीसह विविध विषयांचे मार्गदर्शनपर व्याख्याने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे खेड्यापाड्यातील विद्यार्थी, अगदी शेतात काम करत असतानाही, या व्याख्यानांद्वारे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक ज्ञान आणि माहिती मिळवू शकतात.
हा प्रकल्प ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ प्रदान करेल आणि त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रेरणा देईल, अशी आशा लाखनी ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ यांनी व्यक्त केली. यावेळी महिला कर्मचारी विजया घोनमोळे, रोहित नंदेश्वर, पियुष बाच्छील उपस्थित होते.
जिल्ह्यात पोलिस विभागाकडून “दिशा प्रकल्पास” सुरुवात
