लाखांदूर | अत्यल्प रकमेच्या चोरीच्या संशयातून मित्रानेच मित्राला बेदम मारहाण करून ठार मारल्याची धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यातील विरली (बू) गावाजवळ घडली. ही घटना बुधवारी दुपारी २.४५ वाजता पौना (बू) ते विरली (बू) कालव्याच्या पळीवर घडली. मृतकाचे नाव नरेश रामकृष्ण दुनेदार (वय ४५, रा. विरली बू) असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, नरेश दुनेदार आणि नारायण धोंडू मेश्राम हे दोघे मासे पकडण्यासाठी कालव्याच्या पळीशेजारील नाल्यात उतरले होते. यावेळी नरेशच्या खिशातील काही रकमेच्या चोरीचा संशय घेऊन दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात नारायणने नरेशला हाताबुक्क्यांनी आणि मोठ्या दगडाने प्रहार करीत बेदम मारहाण केली. नरेश बेहोश झाल्यानंतर त्याला नाल्यात खेचून फेकून दिले. नरेशच्या खिशात धान विक्रीचे सुमारे १० हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
मारहाणीनंतर नारायण हा स्वतः गावात परतला आणि ‘मी नरेशला मारले’ असे उघडपणे सांगत फिरल्याच्या चर्चा गावात सुरू आहेत. घटनेची कुणकुण लागताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. लाखांदूर पोलीस ठाण्याला बातमी मिळताच पोलीस निरीक्षक सचिन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गंद्रे, पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम यांच्यासह पथक तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी लाखांदूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांना तपासात मोठी मदत झाली. या व्हिडिओच्या आधारे नारायण धोंडू मेश्राम (रा. विरली बू) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. मृत नरेश हा गावात पानटपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मोठा आप्तपरिवार असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
धक्कादायक ; चोरीच्या संशयातून मित्रानेच घेतला मित्राचा जीव
लाखांदूरात तालुक्यातील घटना

