भंडारा : मोहाडी पंचायत समितीअंतर्गत टाकला ग्रामपंचायतीत मग्रारोहयोच्या कामावर आदिवासी महिला आणि ग्रामपंचायत सदस्य अरुणा उईके यांचा तांत्रिक पॅनलल अधिकारी (टीपीओ) युवराज बारई यांनी सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, बारई यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी जोर धरत आहे. पण, १२ दिवस उलटूनही चौकशीला सुरुवातच झाली नाही. यामुळे लाडक्या बहिणीवर अन्याय करणाऱ्या टीपीओला नेमके कोण संरक्षण देत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
काय आहे प्रकरण?
टाकला ग्रामपंचायतीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मग्रारोहयो) बालकदास ठाकरे ते सहादेव पटले यांच्या शेतापर्यंत पांदण रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावर आदिवासी महिला मजूर अरुणा उईके मेहनत घेत होत्या. २९ मे रोजी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास टीपीओ युवराज बारई यांनी कामाच्या ठिकाणी येऊन अरुणा यांना अपमानास्पद शब्द वापरले आणि इतर मजुरांसमोर त्यांची मानहानी केली, असा गंभीर आरोप तक्रारीत आहे.
पोलिसांत तक्रार, गुन्हा दाखल
या अपमानाचा जाब विचारण्यासाठी अरुणा उईके यांनी आंधळगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार, टीपीओ युवराज बारई, टाकला ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक १४८/२०२५, कलम २९६, ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. अरुणा उईके या केवळ मजूर नसून ग्रामपंचायत सदस्यही असल्याने मागासवर्गीय महिला लोकप्रतिनिधीचा असा अवमान होणे, ही बाब गंभीर मानली जात आहे.
प्रशासनाकडे तक्रार, पण कारकचाही खोळंबा
या प्रकरणी अरुणा उईके यांनी २ जून रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे आणि मोहाडीचे गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यांनी टीपीओ बारई यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. मात्र, १२ दिवस उलटूनही प्रशासनाने साधी चौकशीही सुरू केलेली नाही.
जनतेचा सवाल : टीपीओला पाठबळ कुणाचं?
प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे गावात संतापाची लाट उसळली आहे. लाडक्या बहिणीवर अन्याय करणाऱ्या टीपीओला कोणता प्रभावशाली व्यक्ती पाठिशी घालत आहे, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. अरुणा उईके यांचा अपमान हा केवळ वैयक्तिक नसून, मागासवर्गीय महिला लोकप्रतिनिधीच्या सन्मानावर घाला आहे, अशी भावना गावकऱ्यांमध्ये आहे. प्रशासन लवकर कारवाई न केल्यास जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.
पुढे काय?
या प्रकरणाने भंडारा जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ माजली आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे जनतेचा विश्वास डळमळत आहे. लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा, लाडक्या बहिणीच्या अपमानाला वाचा फोडण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात येत आहे.