चौफेर प्रतिनिधी नागपूर | आम्ही महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढणार आहोत. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपच्यावतीने पार्लमेंटरी वोर्ड घेईल. हा विषय माझा नाही आणि माझा अधिकारसुद्धा नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
उपमुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात शहरातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री विधानसभेच्या आधी ठरवायचा की नंतर हा सुद्धा निर्णय तेच घेतील. या विषयावर महायुतीमध्ये कुठलेच मतभेद नाहीत आणि संभ्रमसुद्धा नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मी आधुनिक अभिमन्यू विरोधकांना फक्त एका व्यक्तीवरच हल्ला करावासा वाटतो, शरद पवारही तेच करतात, काँग्रेसही तेच करते. मनोज जरांगे तर आहेतच. पण एकच गोष्ट सांगतो यांना वाटत असेल की, हे माझ्या विरोधात चक्रव्यूह तयार करत आहेत.
मात्र, तुम्ही (विरोधक) चक्रव्यूह करुन माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असलात तरीही मी आधुनिक अभिमन्यू आहे. चक्रव्यूहात कसे शिरायचे आणि बाहेर कसे यायचे आहे हे मला माहीत आहे. काहीही झाले तरीही माझा अभिमन्यू होणार नाही, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.