>>>>>भंडारा चौफेर | लाखनी प्रतिनिधी
जिल्ह्यातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिले होते. त्यानुसार साकोली तालुक्यातील बेकायदेशीर रेतीतस्करी करणारा सराईत गुन्हेगार सोनमाळा निवासी एकाला जिल्ह्यातून तीन महिन्याकरिता हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे.
साकोली तालुक्यातील सोनमाळा येथील कुख्यात गावगुंडास जबरदस्तीने रेतीतस्करी करून अधिकाऱ्यास धमकावणे व गावातील लोकांना विनाकारण त्रास देणे या गुन्हयांमध्ये दोषी ठरवित जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनमाळा निवासी चंदू भास्कर फुंडे वय (38) वर्षे हा धडधाकट शरीरयष्टीचा व्यक्ती असून, गेल्या अनेक वर्षापासून तो बेकायदेशीर रेतीतस्करी, शासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी करीत असे. तसेच चोरी करणे ई. कारणांमुळे त्याच्याविरोधात साकोली व लाखनी पोलीस स्टेशन मध्ये अनेक गुन्हे नोंद आहेत.
या, संवेदनशील अपराधीक कृत्यांमुळे गावातील तसेच गावालगतच्या खेड्यापाड्यात काही विचित्र प्रकार घडू नये. गावात व आजूबाजूच्या परिसरात शांतता नांदावी या हेतूने भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार रेतीमाफिया चंदू फुंडे याला तीन महिण्याच्या कालावधीकरीता जिल्हाबंदी करण्यात आले आहे. त्यामुळे गावात व परिसरात भयमुक्त वातावरण आहे.
चंदू फुंडे याचेविरुद्ध साकोली, लाखनी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, त्याच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र तरी देखील त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने त्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.