>>>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर साकोली विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीत कोणाकडे जाणार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान आमदार नाना पटोले यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार कोण असणार? या विषयावर चर्चा रंगत आहे.
हेही वाचा : आमचे ठरले!भंडारा पवनी विधानसभा आता आमची
विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीविरुद्ध महायुती, अशी होणार हे निश्चित आहे. साकोली मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे आमदार पटोले यांचे नाव निश्चित मानले जात आहे.
तसेच महायुतीकडून भाजपाचे माजी आमदार राजेश (बाळा) काशीवार, सोमदत्त करंजेकर, अॅड. वसंत एंचिलवार, डॉ विजया ठाकरे नंदूरकर, प्रकाश बाळबुध्दे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अविनाश ब्राम्हणकर यांची नावे चर्चेत आहेत. त्या सहा जणांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली असून महायुतीच्या उमेदवारीसाठी त्यांच्यात स्पर्धा लागण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा : विदर्भात भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता ?
गेल्या काही काळामध्ये राज्यातील राजकीय वातावरणात गतीने बदल होत आहेत. शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये गट पडले. त्यानंतर भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) हे तीन पक्ष महायुती म्हणून एकत्र आले आहेत. ते सध्या सत्तेत आहेत.
तसेच आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढविण्याचे संकेत या तीनही पक्षांच्या नेत्यांकडून दिले जात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (ठाकरे गट) हे महाविकास आघाडी म्हणून एकत्र असून ते महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविणार आहेत.
महाविकास आघाडीत साकोली विधानसभेची जागा काँग्रेस पक्ष लढविणार आणि आमदार नाना पटोलेउमेदवार असणार, हे नक्की झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, महायुती म्हणून निवडणूक लढवली जात असताना साकोली विधानसभा मतदारसंघ महायुतीत कोण लढणार आणि उमेदवार कोण? याबाबत अद्यापही घोषणा झाली नाही.
हेही वाचा : माजी नगराध्यक्षाच्या बनावट साक्षऱ्या करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार!
महायुतीत माजी आमदार काशीवार व करंजेकर यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक आहे. तसेच विजया ठाकरे नंदूरकर या भाजपमध्ये काम पाहात आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अॅड. वसंत एंचिलवार यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी थेट संपर्क आहे. तर राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अविनाश ब्राम्हणकर हे खा. प्रफुल्ल पटेल यांच्या खास मर्जीतील आहेत.
महायुतीत एकत्र असणारे काशीवार, करंजेकर, एंचिलवार, ठाकरे नंदूरकर, ब्राम्हणकर यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये साकोली विधानसभा मतदारसंघातील जागा मिळविण्यासाठी स्पर्धा रंगण्याची चिन्हेही दिसू लागली आहेत.
भाजपाची तिकीट न मिळाल्यास काही इच्छुक हे अपक्ष म्हणून पुन्हा एकदा रिंगणात उतरतील, असेही त्यांच्या समर्थकांमधून बोलले जात आहे. जर तसे झाले तर महायुतीतून उमेदवारीसाठी आपआपसातच स्पर्धा रंगू शकते.

