>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
भंडारा जिल्ह्यातील राजकारण आगामी नगर परिषद निवडणुकीमुळे ढवळून निघाले आहे. २ डिसेंबरला होऊ घातलेल्या या निवडणुकीत भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली या चार नगर परिषदांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीनंतर वर्षभराने होत असलेली ही निवडणूक विद्यमान आमदारांसाठी एकप्रकारे ‘चाचणी परीक्षा’च ठरणार आहे. विशेषतः साकोली नगर परिषदेचा गड राखण्यासाठी काँग्रेसचे आमदार नाना पटोले आणि भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आमदारांसाठी कसोटीचा काळ
या निवडणुकांच्या निकालातून आमदारांना मिळालेले यश, मताधिक्य आणि मतदारसंघावरील प्रभाव स्पष्ट होणार असल्याने, त्यांच्यासाठी हा ‘परीक्षेचा काळ’ आहे. तब्बल साडेतीन वर्षांच्या कालावधीनंतर नगर परिषद निवडणुका होत आहेत. २०१७ मध्ये साकोली नगर परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता होती, तेव्हा पटोले भाजपचे आमदार होते. आता ते काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे, भाजपचा मानला जाणारा हा गड काँग्रेसच्या ताब्यात आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.साकोली नगर परिषद हा भाजपचा गड मानला जातो. त्यामुळे, हा गड अक्षुण्ण ठेवण्याचे मोठे आव्हान आमदार फुके यांच्यासमोर असणार आहे.
प्रफुल्ल पटेलांसाठी ‘प्रतिष्ठेची’ लढाई
या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही लक्ष घातले आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी साकोलीत तळ ठोकला असून ते जोर लावत आहेत. या पार्श्वभूमीवर, साकोली नगर परिषदेवर आमदार नाना पटोले (काँग्रेस), आमदार परिणय फुके (भाजप) की सुनील फुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) यापैकी कोण बाजी मारणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

