>>>>भंडारा चौफेर | संदीप नंदनवार
साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रभावी उमेदवार म्हणून गणले जातात. मागील २५ ते ३० वर्षांपासून ते या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत. गल्लीतील राजकारणापासून तर मुंबई दिल्लीतील राजकारणापर्यंत झेप घेतल्याने त्यांचा एवढा निसटता विजय होईल, हे कुणालाच वाटले नव्हते. नाना पटोले यांनी मागील २५ वर्षांत कुठलाही उद्योग या क्षेत्रात आणला नाही. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या नाही. परिणामी त्यांना या निवडणुकीत चांगलीच चपराक बसली.
साकोली विधानसभेत साकोली, लाखनी व लाखांदूर हे तीन तालुक्यांचा समावेश असला तरी विशेष म्हणजे मागील २५ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत लाखांदूर हे नाना पटोले यांच्या विविध राजकीय स्थित्यंतराचे केंद्र ठरले आहे. नानांनी देखील लाखांदूर तालुक्याला कर्मभूमीच मानले आहे. मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या कर्मभूमीनेच नानांचा विजय निश्चित केला होता. त्याच इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली असून यंदा देखील या कर्मभूमीनेच नानांचा विजय निश्चित केल्याने अखेर नाना कर्मभूमीनेच तरले अशी खमंग चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निसटता विजय पाहू जाता, नक्कीच त्यांनी २५ वर्षांत काय केले, हे स्पष्ट होत आहे. अपक्ष उमेदवारांचा सर्वात जास्त फटका भाजपला बसला असून भाजप उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकावर जावे लागले, हे विशेष. साकोली विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या फेरी पर्यंत अत्यंत रंगतदार ठरलेल्या मतमोजणीत नांनाचा केवळ २०८ मतांनी विजय झाला. २४ व्या फेरी अखेर २ हजार ६८० मतांनी पिछाडीवर असलेले नाना पराभूत होतात की काय?
या भीतीने सर्वत्र धाकधूक वाढली होती. तथापि महायुतीच्या उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी गुलाल उधळून विजयाचा जल्लोष देखील सुरू केला होता. अशातच मतमोजणीच्या ४ फेऱ्या शिल्लक असल्याचे कळताच नाना समर्थक मतदारांत पुन्हा उत्साह संचारला.
दरम्यान, शिल्लक ४ फेऱ्या अंतर्गत लाखांदूर तालुक्यातच जवळपास ५६ बूथ अंतर्गत मतमोजणी केली जाणार असल्याने सर्वत्र उत्सुकता दिसून येत होती. ४ फेऱ्या पैकी २ फेऱ्याची मतमोजणी झाली असता नाना केवळ १ हजार ४१२ मतांनी पिछाडीवर होते. तर उर्वरित २ फेऱ्याची मतमोजणी शिल्लक होती. अशातच उर्वरित दोन्ही फेऱ्याची मतमोजणी झाली असता नानांना पोस्टल मतांचे आधारे केवळ २०८ मतांनी विजयी घोषित करण्यात आले.
एकंदरीत शेवटच्या फेरी पर्यंत अत्यंत रंगतदार ठरलेल्या या निवडणुकीत लाखांदूर तालुक्यातील विशेषत: चप्राड येथील बूथ क्रमांक ३६६ अंतर्गत स्थानिक मतदारांनी नांनाना दिलेला कौल महत्त्वपूर्ण ठरला आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नानांना विजयी घोषित केले. दरम्यान सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत लाखांदूर तालुक्यातील मतदार जनतेने नानांना दिलेला कौल महत्त्वपूर्ण ठरताना अखेर कर्मभूमीनेच तारल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे.
कार्यकर्त्यांचा विजय
मला मिळालेला विजय हा खऱ्या अर्थाने माझ्यासाठी साकोली मतदार संघात झुंजणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यांच्या संघर्षानेच मला आमदार म्हणून जनतेने मला पसंती दिली. मतदारसंघाचा विकास हेच माझे ध्येय आहे.
-नाना पटोले, आमदार, साकोली विधानसभा
विजयाची कारणे
लोकनेता म्हणून प्रसिध्द असलेले नाना पटोले यांची ख्याती निवडणूकीत महत्वाची ठरली. तालुक्यात सांगण्यासारखे मोठे कार्य नसले तरी कार्यकर्त्यांशी जुळलेली नाळ नाना पटोलेंसाठी लाख मोलांची साथ ठरली.
मतविभाजनाचा झाला परिणाम
अवघ्या २०८ मतांनी विजयी झालेल्या नाना पटोले यांना आत्मचिंतनाची आता गरज आहे. साकोली विधानसभेत त्रिकोणी लढत पहावयास मिळाली. भाजपचे अविनाश ब्राह्मणकर व अपक्ष उमेदवार डॉ. सोमदत्त करंजेकर यांच्या उमेदवारीमुळे अविनाश ब्राह्मणकर यांची मते विभागल्या गेली. त्याचा थेट परिणाम नाना पटोले यांच्या मतांवर झाला. अपक्ष उमेदवार करंजेकर रिंगणार नसते तर, भाजपाला विजय मिळाला असता, असे जाणकारांचे मत आहे.
या मतदारसंघातील अनुसूचित जाती जमातीची मतेही विभागली गेली. डॉ. अविनाश नान्हे आणि अपक्ष सोमदत्त करंजेकर यांच्याकडे या मतांची विभागणी झाली. ही परंपरागत मते काँग्रेसची असली तरी विभाजनामुळे त्याचा लाभ होवू शकला नाही.
टपाली मतांनी पटोलेंना तारले
भाजपचे अविनाश ब्राह्मणकर आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. दोघांमधील मतांचे अंतर पाहता निवडून कोण येईल, याचा अंदाज येत नव्हता. भाजप आणि काँग्रेसमध्ये फक्त शंभर ते दीडशे मतांची आघाडी दिसत होती. मात्र टपाली मतांमध्ये नाना पटोले यांनी आघाडी घेतली, त्यामुळे ते तरले.
फेर मतमोजणीची मागणी फेटाळली
पटोले यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर माजी खासदार सुनील मेंढे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे, भाजपाचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे यांनी फेर मतमोजणीची मागणी फेटाळली. मतमोजणीदरम्यान मतदानाची आकडेवारी चकीत करणारी आहे.
विजयाची घोषणा झाल्यानंतर नाना पटोले २०८ मतांनी निसटता विजय झाला. त्यांना ९६,७९५ मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे अविनाश ब्राह्मणकर राहिले. त्यांनीही ९६,५८७ मते घेतली. तर अपक्ष उमेदवार डॉ. सोमदत्त करंजेकर १८,३०९ मते मिळवून तिसरा क्रमांक राखला. तर चवथ्या क्रमांकावर वंचितचे डॉ. अविनाश नान्हे राहिले.