भंडारा : साकोली भूमि अभिलेख कार्यालयाने नागरिकांना अत्याधुनिक आणि सुलभ सेवा देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. जिल्हा सूचना केंद्र भंडारा यांच्या सहकार्याने विकसित केलेल्या नवीन संकेतस्थळ आणि QR कोड सुविधेचे लोकार्पण जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते (दी.11) एप्रिल रोजी, महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या निमित्ताने करण्यात आले.
घरबसल्या तक्रारी आणि माहिती मिळवणे आता सोपे
या डिजिटल उपक्रमामुळे नागरिकांना आता घरबसल्या कार्यालयाशी संबंधित तक्रारी नोंदवणे प्रलंबित कामांची स्थिती तपासणे आणि आवश्यक माहिती मिळवणे शक्य होणार आहे. QR कोड स्कॅन करून तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, नवीन संकेतस्थळावर योजना कार्यपद्धती शासन निर्णय परिपत्रके आणि इतर उपयुक्त माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
याप्रसंगी लोकार्पण सोहळ्याला महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्यालयाचे अधिकारी फुलझेले यांनी संकेतस्थळ आणि QR कोडच्या उपयोगितेवर प्रकाश टाकला. जिल्हाधिकारी डॉ. कोलते यांनी उपअधीक्षक फुलझेले, NIC चे अधिकारी वासनिक तसेच निवासी उपजिल्हाधिकारी बेलपात्रे यांचे विशेष अभिनंदन केले.
पारदर्शक आणि वेगवान सेवेचा संकल्प
हा उपक्रम नागरिकांना पारदर्शक आणि जलद सेवा देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. कार्यक्रमाच्या समारोपात कार्यालय अधीक्षक रोहिणी पाठराबे यांनी सर्वांचे आभार मानले. साकोली भूमि अभिलेख कार्यालय आता डिजिटल युगात प्रवेश करत नागरिकांच्या सेवेत आणखी सक्षमपणे कार्यरत आहे.