भंडारा | रेल्वे प्रवासी आणि रेल्वे वाहतूक समितीची सततची मागणी आणि निवेदनांच्या अनुषंगाने तत्कालीन खासदार सुनील मेंढे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर रिवा ईतवारी या आठवड्यातून तीनदा चालणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीला तुमसर रोड रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला आहे. 8 सप्टेंबर रोजी याचा शुभारंभ झाला.
खासदार असताना सुनील मेंढे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील काही रेल्वे स्थानकांवर सुपरफास्ट आणि पॅसेंजर गाड्यांना थांबा देण्याच्या संदर्भात विनंती केली होती.
यात रिवा इतवारी या आठवड्यातून तीनदा चालणाऱ्या एक्सप्रेस गाडीचाही समावेश होता रिवा इतवारी 11754 आणि इतवारी रीवा 11753 या गाडीला थांबा द्यावा अशी मागणी सुनील मेंढे यांनी केली होती. त्यानंतरही सातत्याने या अनुषंगाने त्यांनी पाठपुरावा केला. सहा महिन्यांपूर्वी ही मागणी मान्य झाली होती. मात्र प्रत्यक्षात दोन दिवसांपूर्वी ही गाडी तुमसर रेल्वे स्थानकावर थांबली आणि प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मध्यप्रदेशात जाणाऱ्या अनेक व्यावसायिकांना ही गाडी अत्यंत सोयीची आहे. त्यामुळे कित्येक दिवसांपासून थांबा मिळावा अशी मागणी प्रवासी आणि व्यापारांची होती. तत्कालीन खासदार सुनील मेंढे यांनी या मागणीला लावून धरून सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर ती मागणी प्रत्यक्षात आली असून, 8 सप्टेंबर रोजी या गाडीचे तुमसर रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आले. रेल्वे यात्रा समितीच्या वतीने माजी खासदार सुनील मेंढे यांचे आभार मानले आहेत.