भंडारा चौफेर प्रतिनिधी | प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (टप्पा-2) उदिष्ट वितरणात घर पडलेल्या अति गरजू लाभार्थ्यांना घरकूल देता येत नसल्याने सरपंच व ग्रामपंचायत कमेटी यांना बऱ्याच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे गावस्तरावर काम करताना सरपंचाना जनतेच्या रोषाला समोर जावे लागत आहे. करिता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भंडाराचे प्रकल्प संचालक यांनी आपल्या स्तरावरून सदर योजनेत सुधारणा कराव्यात. अशी मागणी भंडारा जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने पत्राद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत, सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरद इटवले यांनी सांगितले की, ग्रामपंचायतने ग्रामसभेनुसार प्राधान्यक्रमाने लावून दिलेली घरकुल लाभार्थ्यांची यादी आणि मंजूर झालेली लाभार्थ्यांची यादी यांच्यात तफावत आहे. त्यामुळे ग्रामसभेला अधिकार नाही असे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामसभेनुसार मंजूर करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या यादीला प्राधान्यक्रम देवून कारवाई करण्यात यावी, असे इटवले यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे, सन २०२४ मध्ये अतिवृष्टीने ज्या घराचे नुकसान झाले व घर पडले अशा लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा तात्काळ लाभ देण्यात आला नाही. ग्रामसभेत ठराव मंजूर करुनही त्यानुसार गावातील गरजू घरकुल लाभार्थ्यांना घरुकुल मिळाले नसून यात अनियमितता दिसून येत आहे. तसेच गावातील अनुसूचित जाती जमातीच्या घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुल दिले गेले आहे.
मात्र, या अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांचा काही कोटा बाकी आहे.ग्रामपंचायत अंतर्गतअनुसूचित जाती जमातीच्या संपूर्ण लाभार्थ्यांना देवूनही कोटा शिल्लक राहत असल्यास हा उर्वरित कोटा गावातील जनरल कोट्यात वर्ग करून त्या कोट्यात वाढ करून देण्यात यावी, अशी मागणीही पत्राद्वारे सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शरद इटवले यांनी केली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेत अती गरजू ,विधवा,दिव्यांग लाभार्थ्यांना घरकुल चा लाभ देण्यात यावा. व याची निवड करण्याचे अधिकार ग्रामसभेला देण्यात यावे.जेणे करून वंचित राहिलेले अती गरजू लाभार्थी यांचा रोष ग्रामपंचायत व सरपंच यांच्यावर राहणार नाही.
-शरद इटवले
अध्यक्ष जिल्हा सरपंच संघटना भंडारा

