>>>भंडारा चौफेर | प्रतिनिधी
लाखनी तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण शुक्रवारी (11 जुलै 2025) तहसील कार्यालयाच्या सभागृहात जाहीर करण्यात आले. 5 मार्च 2025 ते 4 मार्च 2030 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 20 ग्रामपंचायतींसह एकूण 71 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी ही आरक्षण सोडत पार पडली. यात 37 जागांवर महिलांना संधी मिळणार असून, अनुसूचित जाती (SC) साठी 13, अनुसूचित जमाती (ST) साठी 5 आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (OBC) 19 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
महिलांना मोठी संधी
आरक्षण सोडतीनुसार, 37 ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच निवडल्या जाणार आहेत. यात अनुसूचित जातीच्या 7, अनुसूचित जमातीच्या 3 आणि ओबीसीच्या 10 जागांचा समावेश आहे. सर्वसाधारण प्रवर्गात 34 जागा राखीव असून, त्यापैकी 18 ठिकाणी महिला सरपंच निवडून येतील. भारतीय संविधानातील तरतुदींनुसार, सर्व सामाजिक प्रवर्गांना समान संधी आणि मागासवर्गीय तसेच महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
सोडत प्रक्रिया पारदर्शक
लाखनी तहसील कार्यालयात सकाळी 11 वाजता पार पडलेल्या या सोडत प्रक्रियेत तहसीलदार धनंजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नायब तहसीलदार (निवडणूक) धर्मेंद्र उरकुडकर, मंडळ अधिकारी अतुल वऱ्हाडे, ग्राम महसूल अधिकारी कुमारी सांगोळकर आणि महसूल सहाय्यक राघोर्ते उपस्थित होते. चार वर्षीय मल्हार राजेश चकोले याच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीद्वारे ही सोडत काढण्यात आली. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रभाग सदस्य आणि सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
असे आहे सरपंच पदाचे आरक्षण
अनुसूचित जाती | दैतमांगली, पेंढरी, खैरी, मानेगाव/सडक, इसापूर, मचारना, जेवनाळा. अनुसूचित जाती (महिला) | खराशी, गोंडसावरी, घोडेझरी, सेलोटी, पिंपळगाव/सडक, किन्ही, गोंडेगाव. अनुसूचित जमाती | गराडा, सोमलवाडा. अनुसूचित जमाती (महिला) | राजेगाव, केसलवाडा/पवार, बोरगाव.
नागरिकांचा मागास प्रवर्ग | धाबेटेकडी, सामेवाडा, धानला, गडेगाव, मिरेगाव, वाकल, पाथरी, पालांदूर, निमगाव. (महिला) देवरी, शिवणी, केसलवाडा/वाघ, पोहरा, डोंगरगाव/न्याहारवाणी, किटाडी, मोगरा, मरेगाव, रेंगेपार/कोठा, भूगाव.
सर्वसाधारण | मासलमेटा, मोरगाव, सिंदीपार, आलेसुर, विहिरगाव, सोनमाळा, खेडेपार, पेंढरी, कवलेवाडा, कनेरी, परसोडी, मांगली, निलागोंदी, मेंढा, पळसगाव, मुरमाडी/तूप. सर्वसाधारण (महिला) कन्हाळगाव, दिघोरी, सालेभाटा, चान्ना रेंगोळा, रामपुरी, सावरी, झरप, मुरमाडी/सावरी, लोहारा, रेंगेपार/कोहळी, गुरढा, लाखोरी, खुनारी, सिपेवाडा, गोंदी, कोलारी.
ग्रामविकासाला चालना
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावाचा कारभार हाकला जातो. ग्रामस्थांनी निवडलेल्या लोकप्रतिनिधींवर गावाच्या विकासाची जबाबदारी असते. या आरक्षणामुळे महिलांना आणि मागासवर्गीयांना गावाच्या विकासात सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे. येत्या निवडणुकीत लाखनी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या नेतृत्वात मोठा बदल दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.