>>>>संदीप नंदनवार | भंडारा चौफेर
भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघासाठी अनेक नेत्यांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. तर अनेक राजकीय पक्षाचे नेते सध्या नवनवीन संकल्पना वापरून प्रकाशझोतात राहण्यासाठी त्याचबरोबर मतदारांना आकर्षित करण्यासाठी गावभेट, उद्घाटने, भूमिपूजन समारंभ, धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी धडपड सुरू आहे.
तर, यंदा भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत बिघाडी होऊन बंडखोरी होण्याची भीती निर्माण झाली असली तरी निवडणूक घोषित झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार असून तो पर्यंत राजकीय चर्चाना उधाण तर येणारच आहे.
भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघात सध्या शिंदे सेनेचे नरेंद्र भोंडेकर हे आमदार आहे. त्यामुळे युतीत हा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) च्या वाट्याला जाण्याची शक्यता अधिक आहे. असे असले तरी भाजपाने शिवसेनेविरोधात कुरघोडी करीत युती धर्मात खोडा करण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
केंद्रात व राज्यात शिवसेना (शिंदे गट), भाजपा व राष्ट्रवादी महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभेच्या तोंडावर भाजपाने शिवसेनेच्या विरोधात कुरघोडी न करता युती धर्म पाळावा, ठिकठिकाणी ठराव घेत भाजपाला जागा मागण्याचा दबावाचा प्रयत्न बंद करावा.
शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आमदार भोंडेकर हेच राहतील. लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराचा पराभव अंतर्गत कलहामुळे झाला. यासाठी शिवसेनेवर पराभवाचे खापर फोडणे चुकीचे आहे, असे शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
तर दुसरीकडे मविआतही भंडारा – पवनी जागेवरून काँग्रेस व उबाठाद्वारे दावे प्रतिदावे केले जात आहे. दरम्यान २००९ पासून ही जागा शिवसेना ठाकरे गटाची असल्याचे सांगत ठाकरे गट या जागेसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. मात्र, मिळालेल्या माहितीवरून ठाकरे गटात उमेदवार स्थानिक की बाहेरचा यावरून चांगलाच कलगीतुरा रंगत आहे.
भंडारा जिल्ह्यात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक जेष्ठ शिवसैनिकांना (ठाकरे गट) विश्वासात न घेता, स्थानिक कार्यकर्त्यांच्या आवाजाची अनदेखी करून, संपर्कप्रमुख व भंडारा जिल्हाप्रमुख यांनी बाहेरील लोकांशी आर्थिक व्यवहार करून पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
नागपूरचे पार्सल असलेले पहाडे यांना पुढे, आणून शिवसैनिकांमध्ये फूट पाडण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप उबाठाचे उपजिल्हाप्रमुख तथा जि.प. भंडाराचे माजी उपाध्यक्ष दिपक गजभिये, चंद्रकांत ऊके (माजी जिल्हा परिषद सदस्य) आकाश दुर्गे यांनी केला आहे. तर दुसरीकडे मविआतील घटक पक्ष काँग्रेसने या मतदारसंघावर आपला दावा ठोकला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी सांगितले की, या मतदारसंघात काँग्रेसचे संघटन मजबूत आहे. जिल्हापरिषद पंचायत समिती असो वा गावपातळीवरील ग्रामपंचायत असो यामध्ये काँग्रेसचे संघटन खोलवर रुजलेले आहे. मविआच्या जागा वाटपाच्या फार्मुल्यानुसार ही जागा काँग्रेसला देण्यात यावी यासाठी आम्ही आग्रही असल्याचे पंचभाई यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे, महायुती व महाविकास आघाडीत अनेक इच्छुक असल्याने कोण कोणाविरुद्ध बंडखोरीकरून कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणार की त्यांचे बंड पक्षश्रेष्ठी थंड करून गपगार करणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. त्यामुळे मतदारसंघ एक आणि इच्छुक अनेक अशी स्थिती झाली आहे.
आमचा विकास भाजपाला आवडला नाही!
भंडारा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. भंडाराची जागा शिवसेनेची असल्याने आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे तिकीट पक्के आहे. शिवसेनेने भंडारा विधानसभेत केलेला विकास भाजपाच्या डोळ्यात सलत आहे. त्यांना आमचा विकास आवडलेला नाही. भाजपाचा अधिक आग्रह असेल तर त्यांनी स्वतः जागा लढवावी, जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी सामोरे जाऊ, असा इशाराही शिवसेना शिंदे गटाने भाजपाला दिला आहे.
पवनीचा उमेदवार ठरला तर, महायुतीत सेना व भाजपला तर महाविकास आघाडीत उबाठा व काँग्रेसला हा मतदारसंघ हवा आहे. त्यामुळे इच्छुक आतापासूनच फिल्डींग लावून आहेत. या मतदारसंघात काँग्रेस, सेना व भाजपला मानणारा मोठा मतदार याभागात आहे. त्यामुळे युतीतून शिंदे सेना व भाजपाने तर आघाडीतून उबाठा व काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे.
दरम्यान, महायुती, महाविकास आघाडीतील आतापर्यंतचे इच्छुक हे भंडारा मधीलच असून अन्य कोणी पवनी मधून उमेदवार म्हणून कुणी उभे राहिले तर भंडारा विरुद्ध पवनी अशीच लढत रंगणाची चिन्हे अधिक आहेत.

