लाखनी | चौफेर प्रतिनिधी
समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील बी. ए. भाग एक मधील इंग्रजी मेजर विषयाचा विद्यार्थी राज विरेंद्रसिंह कलचुरी याला ‘इंग्लिश फॉर एव्हरीवन’ या राष्ट्रीय प्रभावशाली मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “गोल्ड प्लेस सर्टिफिकेट ऑफ अचीवमेंट” ने गौरवण्यात आले आहे. हा सन्मान नॅशनल एज्युकेशन (एन.जी.ओ.) दिल्ली तर्फे ९ मे रोजी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात दिला जाणार आहे.सदर्हु कार्यक्रमाला दिल्ली सरकारचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत.
राजने गरीब, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना १०० तासांहून अधिक इंग्रजी हा विषय शिकविला आणि २५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची शंका निरासन करून त्यांचा आत्मविश्वास वाढविला. याचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले गेले व त्याचा लाभ दिल्लीतील अनेक गरजू विद्यार्थ्यांना झाला. इंग्रजी भाषेला सहज व सोपी करून शिकवण्या मधील त्याच्या समर्पणाची दखल घेत राज कलचुरी याला सन्मानित करण्यात येत आहे. सदर मोहीम इंग्रजीचा प्रसार व ‘इंग्लिश स्पिकिंग अवेअरनेस’ वाढवण्याचे दृष्टीने राबविण्यात आली.
राजने केलेल्या उत्कृष्ट कामगिरी करिता समर्थ महाविद्यालय येथील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक व करिअर कट्टा चे भंडारा जिल्हा समन्वयक डॉ. संदीपकुमार सरैया यांनी मार्गदर्शन केले असून सन्मान प्राप्त केल्याबद्दल राज याचे अभिनंदन केले. त्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याकरिता समाजाच्या सर्व स्तरातून राज याची स्तुती होत असून समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. कापसे व इतर सर्व महाविद्यालयीन घटकांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.