>>>>>भंडारा चौफेर | अतुल नागदेवे
विधानसभा निवडणुकीचा जाहिर प्रचार सुरु झाला असुन या निमित्ताने सामान्य कार्यकर्त्यांना सुगिचे दिवस आले आहे. गेली पाच वर्ष सामान्य कार्यकर्त्यांकडे ढुंकुनही न पाहणारे राजकीय नेते कार्यकर्त्यांची विचारपुस करु लागले आहे. कार्यकर्तेही या संधीचे सोने करु पाहत असुन रोख व रात्रीची सोय करुन देत असलेल्याच उमेदवाराच्या प्रचार वाहनात बसत असल्याचे एकंदरीत दिसुन येत आहे.
उमेदवाराव्दारे कार्यकर्त्यांची सरबराईत करण्यात येत असल्याने तालुका व शहरातील धाब्यावर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढत आहे. हिवाळ्याच्या थंडीमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापु लागले आहे.
पुर्वी राजकीय पक्ष व नेत्यासाठी मरणे मारण्यास मागे पुढे न पाहणारे कार्यकर्ते आता सावध भुमिका घेवु लागले आहे. ते, केवळ नेत्यांच्या दुपटी धोरणामुळेच, म्हणुनच तर विधानसभा निवडणुकीकरीता प्रत्येक राजकीय पक्षांच्या उमेदवार व नेत्यांना कार्यकर्त्यांची वनवा भासु लागली आहे.
निवडणुका आले कि उमेदवार व नेत्यांना आपली आठवण येते म्हणुन कार्यकर्ते सुध्दा आता भाव खाऊ लागले आहे. कार्यकर्त्यांच्या मुंड्या दाखवुन उमेदवाराकडुन बंडले मोजुन घेणाऱ्या संधीसाधु नेत्यांना आता कार्यकर्ते कैचीत पकडतांना दिसुन येत आहे. प्रचारांच्या गाडीत बसण्यापुर्वीच रात्रीची संपुर्ण सोय तेही नगदी मध्ये करुन घेण्यावर कार्यकर्त्यांनी भर दिल्याचे दिसुन येते. त्यामुळेच कि काय आज या, तर उद्या दुसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार वाहनात तेच तेच कार्यकर्ते दिसु लागले आहे.
मंत्री, खासदार, आमदार, नेते मंडळी आपल्या स्वार्थासाठी पक्ष बदलतात तर कार्यकर्त्यांनी आज या, तर उद्या दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचार वाहनात का बसु नये? असा संतप्त प्रश्न सुध्दा कार्यकर्ते विचार करू लागले. निवडणुका संपल्या कि उमेदवार व नेते मंडळी आम्हाला विसरणारच असुन निवडणुकीमध्ये ज्या उमेदवाराकडुन जेवढा जास्त आर्थीक फायदा करुन घेता येईल तेवढा करुन घेण्यावर अनेक गावातील कार्यकर्त्यांनी भर देणे सुरु केल्याचे चित्र आहे.
कार्यकर्त्यांच्या या प्रकारामुळे मात्र उमेदवार व नेते मंडळीची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. अनेक गावात तर ८ ते १० जणांचा ग्रुप तयार करुन आम्हाला एक गाडी व रात्रीची संपुर्ण सोय करून द्या म्हणुन संधीसाधु कार्यकर्ते तयार होवू लागले आहे. एका उमेदवाराने नाही म्हटले तर दुसऱ्या उमेदवाराकडे तोच प्रस्ताव मांडण्यात येत आहे. खऱ्या अर्थाने सामान्य कार्यकर्त्यांना सुगिचे दिवस आल्याचे निवडणुकीच्या निमित्ताने दिसुन येत आहे.

