>>>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
पक्षांतर्गत लोकशाहीचा दावा करणाऱ्या भाजपामध्ये साकोली विधानसभा निवडणुकीच्या जागेसाठी पक्षाच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेण्यासाठी मंगळवारी (दि. १ आक्टोबर) भारत सभागृहात मतदान प्रक्रिया पार पडली. साकोली मतदारसंघातील पदाधिकाऱ्याकडूनच इच्छुकांना बंद लिफाप्यात पसंती क्रम देण्यात आला.
हेही वाचा : सत्तेच्या पटलावरही ‘नवदुर्गा’ मोठ्या संख्येने प्रस्थापित व्हावी
मात्र, बंद लिफाप्यात क्रमांक १ वर आपल्या नावाची सरशी व्हावी अशी सुप्त इच्छा असणाऱ्या इच्छुकांची चांगली गोची झाल्याची चर्चा मतदानानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच रंगली. विशेष म्हणजे इच्छुकांकडून पदाधिकाऱ्यांना माझ्या नावाला पहिला पसंती क्रम द्या म्हणून आदल्या दिवशी फोनाफानी झाल्याच्या चर्चेलाही जिल्ह्यात उधाण आले आहे.
हेही वाचा : सरपंच, उपसरपंचाची दसरा, दिवाळी जोमात : घरकुल लाभार्थी कोमात
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात इच्छुक उमेदवारांची नावे व पदाधिकाऱ्यांच्या मनातील उमेदवार जाणून घेण्यासाठी तसेच कोणताही वाद किंवा तक्रारी येऊ नये, यासाठी लोकशाहीच्या मार्गाने ही प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
त्यासाठी आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी साकोली विधानसभा मतदार संघातून भाजपच्या इच्छुक उमेदवारांची नावे जाणून घेण्यासाठी भाजपाचे पक्ष निरीक्षक सुधाकर कोहळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
हेही वाचा : धक्कादायक! ५० वर्षीय आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
या बैठकीत साकोली विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पसंती क्रमांकाने मतदान करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी सुचवलेले इच्छुक उमेदवारांच्या नावाची बंद पाकिटे पक्ष निरीक्षक माजी आमदार सुधाकर कोहळे प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपाने केंद्रातून निवडलेले उमेदवार लादले, त्यामुळे अनेक मतदारसंघांत पराभव पत्करावा लागला. ही चूक सुधारण्यासाठी आता भाजपाने ‘बंद लिफाफा’ सर्व्हेक्षणाचा पॅटर्न अवलंबला आहे. गेल्या दोन दिवसांत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून भाजपाने बंद पाकिटात निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांची नावे मागवली आहेत. त्यामुळे भावी उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
भाजप राज्यातील सर्वच मतदारसंघांत हा प्रयोग करत आहे. दरम्यान, विदर्भातील ६२ पैकी ४५ जागा जिंकण्याचे टार्गेट वरिष्ठांनी पक्षाच्या नेत्यांना दिले आहे. साकोलीत मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा निसटता पराभव झाला होता.
हेही वाचा : दीपोत्सवानंतर लोकोत्सव ! मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे संकेत
सन २०२४ च्या विधानसभा निवडणूकीसाठी भाजपामधून लढण्यासाठी इच्छुकांची संख्या अर्धा डझन आहे. त्यामुळे पक्षाची ही एक प्रक्रिया असली, तरी अंतिम निर्णय मुंबईतच होणार असल्याने साकोलीची भाजपाच्या तिकिटाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
भाजपचा ‘बंद लिफाफा सर्व्हे’ अत्यंत गुप्त
आता महाराष्ट्रातही तीनपेक्षा जास्त टर्म आमदार असलेल्या मतदारसंघात नवीन चेहऱ्याला पसंतीचा कौल मिळाला तर तिथे भाजप नवीन चेहऱ्याचा उमेदवार देऊ शकते. मात्र दिग्गज नेत्यांचा त्याला अपवाद असेल.
प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून बंद पाकिटात आलेली नावांपैकी ३ संभाव्य उमेदवारांची नावे प्रदेशाध्यक्षांपर्यंत जातील. त्यानंतर एक ते दोन दिवसांत हा अहवाल प्रदेश कार्यालयात जमा होईल. नंतर पक्षाच्या कोअर कमिटीमध्ये उमेदवारांच्या नावावर चर्चा होऊन अंतिम निवड केली जाईल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोअर टीमशी संबंधित एका नेत्याने ही माहिती दिली. भाजपचा हा बंद लिफाफा सर्व्हे अत्यंत गुप्त पद्धतीने केला जात आहे.
केवळ औपचारिकता ठरू नये
साकोलीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांना भावी आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांनी सकाळपासून फोनोफानी करून नमस्कार चमत्कार करण्यावर चांगलाच भर दिला होता.
‘बंद लिफाफा सर्व्हे’ ही केवळ औपचारिकता ठरू नये तर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी नोंदविलेल्या पसंती क्रमांकानुसारच वरिष्ठांनी उमेदवार ठरवावा अशी माफक अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

