लाखनी : शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील आदर्श नगर परिसराला लागून असलेल्या बाजार समितीत गेल्या चार महिन्यांपासून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र, काही कारणांमुळे हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी, आदर्श नगर येथील असलेल्या सिमेंट रस्त्यावरून बाजार समितित जाणारे जड वाहतूक ये-जा करीत असून, यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आदर्शनगर प्रभाग क्रमांक ४ मधील रस्त्याने जात असल्याने ओव्हरलोड वाहतुकीमुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे व चिखलाचे साम्राज्य पसरले असल्याने या प्रभागातील नागरिकांना अकारण त्रास सहन करावा लागतो. बाजार समितीच्या ढिसाळ नियोजनामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे.
सदर सिमेंट रस्तावरून विदर्भ महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी तसेच वृद्ध नागरिकांसह अनेकांचा दैनंदिन वापरात आहे. मात्र, या मार्गावर जड वाहतुकीमुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्ता चिखलाने माखला असून, दुचाकीस्वारांना वाहन चालवताना नाहक तारांबळ उडत आहे. “रस्त्यावरून चालताना नागीण नृत्यासारखी कसरत करावी लागते.
विशेष म्हणजे, आमदार परिणय फुके यांचे निवासस्थान हेच आदर्श नगर परिसरात आहे. तरीही या रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. बाजार समितीने जड वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करायला हवी होती, परंतु तसे न झाल्याने हा मुख्य दळणवळणाचा रस्ता खड्डेमय झाला आहे.या रस्त्याची अवस्था पाहता अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.
हा रस्ता आता जीवघेणा झाला आहे. खड्ड्यांमुळे आणि चिखलामुळे दररोज अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः पावसाळ्यात दुचाकी चालवताना जीव मुठीत घेऊन चालवा लागत आहे. बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे आम्हा नागरिकांचं हाल होताहेत. आमदाराचे घर इथेच असूनही हा प्रश्न सुटत नाही, हे लाजिरवानी बाब आहे.
-लवकुश निर्वाण, सामाजिक कार्यकर्ता
आदर्श नगर, लाखनी

