>>>>> संदीप नंदनवार | भंडारा चौफेर
साधु संत येती घरा, तोची दिवाळी दसरा’ ही म्हण सर्वांना माहीत आहे. मात्र, 2014 नंतर निवडणुकाचा माहोल बदलला असुन निवडणुक काळात ‘नेतेमंडळी वा निधीगंगा येती दारा तोची दिवाळी दसरा’ अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे.
हेही वाचा : बापू, लढाई तुलेच लढा लागते, बाकी कोणी खाली नाह्यी
महाराष्ट्रात आगामी निवडमुकींच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय पटलावर निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यावर राजकारण्यांच्या कसे अंगात येते, ते आता बघायला मिळत आहे. अंगात येणारी व्यक्ती एरवी नॉर्मल असते पण ती अचानक घुमू लागते, गोल गोल फिरू लागते. काही बाही बोलू लागते आणि स्वतःच्या अंगात देव किंवा देवी शिरल्याचे इतरांना वाटावे, असे बोलू लागते. मग त्यातून ही व्यक्ती समोरच्यांना प्रश्न विचारते जणू काही देवच या व्यक्तीच्या तोंडून प्रश्न विचारतोय किंवा देवीच प्रश्न विचारते.
हेही वाचा : हे गणराया ! आमदार होऊ दे रे बाप्पा…
मराठीत गझल हा काव्यप्रकार लोकप्रिय करण्यात प्रमुख भूमिका बजावणारे प्रतिभावंत कवी सुरेश भट यांनी दर पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीचे वर्णन अत्यंत प्रभावी शब्दांमधे केलेले आहे.
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
पाच वर्षे गायब असलेले नेते दर पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीच्या वेळी कसे तोंडाला रंग लावून जनता जनार्दनासमोर येतात, त्याचे वर्णन भटसाहेबांनी केलेले आहे. त्यात लोकशाहीची चिंताही त्यांनी प्रत्ययकारी पद्धतीने व्यक्त केलेली आहे.
हेही वाचा : चूक शासनाची अन् रोष मात्र सरपंचांवर
या कवितेची आठवण येण्याचे कारण म्हणजे या अंगात येण्याचे काही मंडळींना बघ्यांना फार कौतुक असते. ते मनोमन नमस्कार वगैरेही ठोकतात आणि काही तर मनोमन नाही तर हात जोडून डोळे मिटून नमस्कार करतात. ‘अजि म्या ब्रह्म पाहिले…’ चा भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटत असतो. तिकडे ते अंगात आलेले ब्रह्म गोल फिरत काही बाही बोलत असते.
अंगात येणे हा प्रकार खरा की वठवलेला, हा वादाचा विषय असेल आणि काही लोकांच्या भावनाही दुखावल्या जाऊ शकतात. पण २१ व्या शतकातही मानवाला न समजलेल्या अनेक बाबींना असली नावे देऊन कमी मूर्खांनी अधिक मूर्खांना अधिकाधिक मूर्ख बनवण्याचे प्रकार सर्रास सुरू असतात.
राजकारणात मैत्री करायची ती दगा करण्यासाठी आणि राजकीय शत्रूला जीवनातून उठवण्याचीच तजवीज करायची, असे हल्लीचे राजकारण झाले आहे. त्यातूनच मग सार्वजनिक पातळीवर केली जाणारी वक्तव्ये, भाषणे यातून हा विखार, द्वेष, खुन्नस हे सारे ओठावर येते आणि राजकारणाबद्दल सर्वसामान्यांना वाटणारा तिटकाराही वाढत जातो.
हे सारं राजकारणाचा स्तर घसरल्याचेच निदर्शक आहेत. पण पीपल गेट रूलर्स दे डिझर्व, या वचनानुसार सर्वसामान्य माणूस जितका भ्रष्ट तितक्याच प्रमाणात किंबहुना थोडे जास्तीच राजकारणी वा नेते भ्रष्ट मिळतात. समाजातला संवाद कमी होऊन फक्त वाद शिल्लक राहू लागलाय. त्यामुळे राजकारणातही त्याचे प्रतिबिंब उमटणारच किंबहुना ते उमटूही लागले आहे.
समाजकारणातून राजकारणाकडे असा मार्ग पूर्वी असायचा. गणेशोत्सवाच्या मांडवात हिरीरिने काम करणारा कार्यकर्ता लोकांची कामे करत करत नेतृत्वगुण जोपासू लागत असे. त्यातून नगरसेवक किंवा ग्राम पंचायत सदस्यपदापासून राजकीय प्रवास सुरू होते असे. हल्ली लोक थेट एमएलसी म्हणजेच विधानपरिषदेवर नियुक्ती व्हावी किंवा पक्षाने आपली अन्य उपयुक्तता लक्षात घेऊन विधानपरिषदेवर किंवा राज्यसभेवर पाठवावे, अशी अपेक्षा ठेवू लागले आहेत.
हेही वाचा : भंडाऱ्याचा पैलवान कोण ?
त्यामुळेच राजकारणात गावोगावच्या राजकिय वकिलांचा भरणा होऊ लागलाय. मुद्देसूदपणे बोलणे, हे फार मोठे क्वालिफिकेशन ठरू लागले आहे. बांधकाम व्यावसायिक किंवा व्यवसाय कन्ट्रक्शन (हा खास राजकारणी उच्चार) असे सांगणारे बहुतेक राजकारणी. त्यातून मग वक्तृत्व नावाचा काही गुण आत्मसात करावा लागतो, याचाच विसर त्यांना पडलाय.
पूर्वी पक्षांतर्गत लोकशाही नावाचा प्रकार काही प्रमाणात का होईना, आहे असे वाटायचे. आता राजकारणच बदलत चालले आहे आणि ज्याच्या हाती ससा तो पारधी या न्यायाने घराणेशाहीचे वारस, धनदांडग्यांचे राजकारण, बाहुबलींचे राजकारण अशा अनेक प्रकारे राजकारण थेट पैसा बळ यातून केले जाऊ लागले आहे.
याचे मूर्तीमंत उदाहरण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात दिसू लागले आहे. आपण कुठले, आपण कुठे व काय करत आहोत, पाच वर्ष आपण कुठे होतो व आता आपण मुंबईची वारी सहज शक्य व्हावी म्हणून आपल्याच विचारांची गळपेची करत आहोत, याचे साधं भानही आपल्याला नाही, ही खरी गोम गावागावात वारा वारा फिरणाऱ्या राजकारण्यांना कळू नये हीच खरी लोकशाहीची थट्टा आहे.
हेही वाचा : दिवाळीनंतर विधानसभेचा धुरळा उडणार ?
सद्यस्थितीला राज्यभरातून शेतकऱ्यांच्या येत असलेल्या भावना तसेच शेतमालाला भाव नसल्यामुळे ऐन हंगामाच्या तोंडावर हातात शेतकऱ्यांच्या काहीच मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे त्यात बाजारभाव घसरल्याने राजकीय पक्ष आपापली पोळी भाजून घेण्याचे काम करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ‘कोणी वाली आहे की नाही’ हाच प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यामुळे बळीराजासाठी राजकारण्यांची केवळ ‘राजकीय नौटंकीच’ सुरुच आहे. हे वास्तव नाकारता येणार नाही.
हेही वाचा : विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचा विषय लई हार्ड हाय ए..?
अतीवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर परिस्थितीने निचपत पडलेला जगाचा पोशिंदा व सद्यस्थितीला राज्यभरातील सर्वच शेतीमाल मातीमोल बाजारभावात विकला जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षाने आंदोलन करायचे आणि विरोधी पक्ष सत्तेत आल्यानंतर त्याच्या विरोधी पक्षाने आंदोलने करायचे पण यामध्ये नुकसान मात्र शेतकऱ्यांचेच होत आहे.
कोरोना कालखंडामध्ये शेतीवर आलेले काळे दिवस अद्यापही कायम आहेत. शेतकऱ्यांची बिघडत चाललेली परिस्थिती याला नक्की कोण जबाबदार आहे हेच कळायला मार्ग नाही. परंतु; राजकीय पक्ष आपला फायदा करून घेतात हेही नक्कीच.
राजकीय स्टंट किंवा राजकारणाची जोड देऊन पडलेल्या बाजारभावावर पांघरूण टाकता येणार नाही तर शेतकऱ्याची परिस्थिती बदलता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती बदलायची असेल तर शेतकऱ्यांबद्दल सरकारकडून ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. फक्त राजकारण करून शेतकरी प्रगत होणार नाही.