>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
राजकीय पटलावर निवडणुकीच्या प्रचार तंत्रात मोठे स्थित्यंतर आले आहे. एकेकाळी गल्लीबोळात उमेदवारांची ओळख बनवणारे रंगवलेले भित्तीपत्रके आणि भिंती आता इतिहासजमा झाल्या आहेत. आता राजकीय पक्षांनी आपली कमान-तीर थेट मतदारांच्या हातात असलेल्या स्मार्टफोनकडे वळवली आहे. परिणामी, भिंती अबोल झाल्या आहेत आणि प्रचाराचे बोल पूर्णपणे ‘हायटेक’ बनले आहेत.
सोशल स्ट्रॅटेजी: एका क्लिकवर थेट ‘मतदार राजा’
पूर्वीच्या प्रचार तंत्रातील कागदी पोस्टर्स, भोंगे आणि लाऊडस्पीकर्सची जागा आता व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबूक आणि ‘एक्स’ (ट्विटर) या माध्यमांनी घेतली आहे. यामुळे प्रचार आता केवळ रस्त्यावर न राहता, मतदाराच्या खिशातील मोबाईल स्क्रीनवर अविरत सुरू आहे. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे राजकीय पक्षांना कोणत्याही ‘वेळ’ किंवा ‘स्थळ’ निर्बंधांशिवाय जनतेशी त्वरित संपर्क साधणे शक्य झाले आहे.
व्हिडिओद्वारे ‘रिपोर्ट कार्ड’
सत्ताधारी पक्ष आपल्या कार्यकाळातील विकासकामांचे ‘रिपोर्ट कार्ड’ आकर्षक, छोटे व्हिडिओ आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून वेबसाईटवर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सादर करत आहेत.सत्ताधारी योजनांवर अभिप्राय घेत आहेत. तर विरोधी पक्ष गोरगरिबांच्या कल्याणाचे आणि अनुदान/विकास करण्याची आश्वासने देऊन मोबाईलवर स्टेटस फिरवत आहेत. अनेक उमेदवारांनी मतदारांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून डिजिटल संपर्क यंत्रणा मजबूत केली आहे.
मतदार झाला ‘स्मार्ट’: दिखाव्यापेक्षा ‘विकास’ महत्त्वाचा
सोशल मीडियावरील ही ‘बॅनरबाजी’ आणि ‘ट्रेंडींग हॅशटॅग्स’ लक्षवेधी असले तरी, मतदानावर त्याचा प्रभाव मर्यादितच राहणार आहे. जागरूकता वाढली आजचा मतदार अधिक सजग आणि जागरूक आहे. केवळ हायटेक फंडा पाहून तो मतदान करत नाही.मतदारांचे लक्ष आता उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता, स्वच्छ प्रतिमा व विकास दृष्टिकोन या मूलभूत बाबींवर अधिक केंद्रित झाले आहे. सोशल मीडियाचा प्रचार तात्पुरता प्रभावी ठरला तरी, मतदानाच्या वेळी मतदार पारदर्शकता, विकास आणि नैतिकतेच्या निकषांवरच आपला अंतिम निर्णय घेतो. यामुळे, मोबाईलवरील ‘संपर्का’सोबतच प्रत्यक्ष गाठीभेटीवरही तितकाच भर देणे पक्षांसाठी आवश्यक आहे.

