>>>>>>संदीप नंदनवार | भंडारा चौफेर
जन पळ भर म्हणतील हाय हाय…. ही भा. रा. तांब्यांचीच नव्हे तर आजच्या काळात राजकारण्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची देखील व्यथा, अन कदाचित निवडणुक पूर्वीची ही हताशा. राजकिय पक्षाशी नाळ जुळून असलेला त्या पक्षाचा कार्यकर्ता केवळ एक औपचारिकता म्हणून निवडणुकीत दारावर आलेल्या आपल्या नेत्यांशी चार शब्द बोलेल अन बंधुत्व व्यक्त करेल.
हेही वाचा : सध्याच्या राजकारणात विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर… अन सच्चे कार्यकर्ते उष्ट्या वाटीवर
पण.. या बोलण्यामुळे व व्यक्त झाल्यामुळे निवडणुकीच्या काळात प्रचाराच्या रणधुमाळीत नुसत्याच वायफळ भावनांचा पूर नेत्यांना आलेला असेल, पण ते शेवटी निष्ठावंत कार्यकर्त्यांजवळ नक्राश्रूच असतील. खरोखर स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीपुरती कार्यकर्त्यांचा वापर करणाऱ्या नेतेमंडळींना हा स्वानुभव नक्कीच येईल, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा : भावी आमदार ! साकोली मतदारसंघात आता ‘या’ जि. प. सदस्याचे झळकले बॅनर
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले। अशीच काहीशी अनास्था भंडारा जिल्ह्यात असलेल्या राजकीय पक्षांची झाली आहे. ही व्यथा व वेदना आता पक्षनिष्ठ असलेला प्रत्येक कार्यकर्ता बोलून दाखवत आहे. सत्तेची रसाळगोमटी फळे चाखण्यासाठी पांढरा सदरा घालून नेता झाल्याचा आव आणत प्रयत्नांच्या पराकाष्ठेत निष्ठेची चेष्टा आता प्रत्येक पक्षातील नेता करत आहे.
हेही वाचा : विधानसभा निवडणुकीसंदर्भात राजकीय हालचालींना वेग
‘र’ राजकारणाचा आता गल्ली पासून दिल्ली पर्यंत सर्वांना कळला आहे. त्यामुळेच, राजकारणात आता वैचारिक मूल्य, तत्वनिष्ठा, पक्षनिष्ठा, त्याग, निःस्वार्थ भावना या सर्व गोष्टी नावालाच राहिल्या आहेत. स्वःहित साधण्यासाठी व्यक्तीनिष्ठेलाच पक्षनिष्ठेचा मुलामा देऊन तत्त्वनिष्ठेच्या गप्पा जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळी व काही स्वयंघोषीत नेतेमंडळीकडून कार्यकर्त्यांसमोर भोपाल्या म्हणून हाकल्या जात आहेत.
निष्ठा हे राजेशाही व सरंजामदारी काळातील मूल्य. निष्ठा जेव्हा तत्त्व , पक्ष, विचार यांच्या संदर्भात येते, तेव्हा त्यास उदात्तता लाभते. परंतु तात्त्विक विचारांचा अंत झालेल्या आजच्या काळात त्या स्वरुपातील निष्ठेला अर्थ राहत नाही. त्यामुळेच राजकारणात पक्षनिष्ठेला औपचारिकरित्या महत्त्व दिले गेले आहे.
हेही वाचा : ‘लाडकी बहिण’ योजना म्हणजे मतांसाठी केलेला जुगाड
विचारांवर निष्ठा असलेली व पक्षाच्या चौकटीत राहून कटिबध्द असणारी व्यक्ती आज प्रत्येक राजकीय पक्षात यायला हवी, असे प्रत्येक प्रामाणिक व राजकारणावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला वाटते किंबहुना तसे बोललेही जाते. पण असे मात्र घडतानी वा बघायला मिळत नाही.
हल्लीच्या राजकारणात राजकीय विचारांपेक्षा “मी” , “माझे” व “स्वार्थीपणा” याला महत्त्व प्राप्त झाले आहे. सत्त्तेच्या माध्यमातून आर्थिक संपन्नता मिळविता येते, याची प्रचिती राजकीय नेत्यांना येऊ लागल्याने विचारसरणी, तत्त्वे व मूल्ये यांना तिलांजली दिली गेली.
म्हणून तर “आयाराम गयाराम” संस्कृती १९६७ मध्ये उदयास आली. तेव्हापासून दलबदलू व्यक्तींसाठी “आयाराम गयाराम” शब्दांचा वापर सुरु झाला. त्यानंतर स्वार्थासाठी पक्ष बदलणे आणि त्याच पक्षात राहून इतर पक्षाच्या नेत्यांसोबत दोस्ताना कायम ठेवणे सुरु झाले.
हेही वाचा : पटोलेंचा पराभव करणे ‘हे’ भाजपासाठी आव्हानच?
जिल्ह्यात काही महिन्यांपुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत एका पक्षाच्या नेत्यांचा विरोधी पक्षा सोबतचा “दोस्ताना” जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना जास्तच परिचित झाला आहे. दिवसभर एकाच व्यासपीठावर राहणारे स्वपक्षातील नेते रात्री मात्र एकमेकांना कुरघोड्या करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतांना क्लृप्त्या लढवत असतात.
याशिवाय आपल्या चेल्यावर मेहरबानी करण्यासाठी तू त्या पक्षाचे काम कर मी या पक्षाचे काम करतो. मग आगामी निवडणुकीत मी तुला तिकिट मिळवून देतो असे सांगत आपल्या चेल्याचपाट्यांना धीर देत असतात. मग चेल्यांचेही पक्षीय विचार, तत्त्वे व निष्ठा गळून पडतात. सहकाऱ्याला पाडण्यासाठी पुन्हा प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते.
मतदारांच्या भेटीगाठीवर भर
विधानसभेची आगामी निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यात बाजी मारण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मात्र आतापासूनच कंबर कसली असून, ग्रामीण भागातील तळागाळापर्यंतच्या मतदारांचे कार्यकर्त्यांमार्फत ब्रेन वॉश करणे सुरू झाल्याचे चित्र जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात दिसत आहे.
सन २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी केंद्र आणि राज्यात आघाडी सरकार होते. मात्र, त्यानंतर सत्तापरिवर्तन होऊन केंद्रात शिस्तबध्द पक्षाने एकहाती वर्चस्व गाजविले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील मतदारांनी शिस्तबध्द पक्षाला नाकारत हातची सूत्रे हिसकावून घेतली.
आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत नेमके काय चित्र राहते, याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. या संदर्भात साकोली, भंडारा व तुमसर मतदारसंघात आतापासूनच चर्चासत्र झडत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, त्यात बाजी मारण्यासाठी इच्छुक असलेल्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी मतदारांच्या भेटीगाठीचे सत्र आतापासूनच सुरु केले आहे.
नेत्यांवर कार्यकर्तेही नाराज!
भंडारा लोकसभा मतदारसंघात नवख्या व अनुभवहीन तरुणाकडे खासदारकीचे सुत्र आहेत. ही सुत्र जरी त्यांच्या हातात असली तरी जिल्ह्याच्या भौगोलीक व राजकिय परिस्थितीचा अभ्यास हा नवख्यासाठी शून्यच. साधा पक्ष कार्यकर्ता नसताना आपला तो बाब्या…
या म्हणीप्रमाणे नाना मातब्बर नेत्यांनी आपला बाब्या पास झाला व आपले “गंगेत घोडं न्हालं” म्हणणे सध्यातरी कार्यकर्त्यांना चूकीचेच वाटत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील शिस्तबध्द पक्षाचा रिमोट 2019 च्या विधानसभेत पराभूत झालेल्या नेत्याकडे असल्याचे बोलले जाते.
हा नेता जिल्ह्यात मोठा असला तरी जमिनीवरच्या कार्यकर्त्याची नाळ ओळखण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. दोन्ही नेत्यांनी स्वतःच्या सोईचे राजकारण केल्याचे सर्वच राजकीय पक्षातील बडे नेत्यांकडून बोलले जात आहे. यामुळे पक्षातील नेत्यांसह कार्यकर्तेही नाराज आहेत.
चहूकडे पेटला आहे वणवा
“नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा, भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौंकडे दावा” या कवितेच्या ओळीनुसार विदग्ध स्थितीत राजकीय पक्षातील नेतेमंडळी वाहून जात आहेत. निवडणुकीत त्यांच्या नावेला देखील पैलतिरी नेणारा सेतू दिसत नाही.
कार्यकर्त्यांना सेतूची उपमा किती सार्थ वाटते. पण कार्यकर्त्यांची व्यथा आणि वेदना ह्या नेतेमंडळीना सतावत आहे. आणि चहूकडे वणवा पेटला आहे. मीच पक्ष, मीच नेता असे म्हणणाऱ्या या नेतेमंडळींच्या मन:स्थितीचे, विषण्णतेचे, हताश अन असहाय्यतेचे हे वर्णन, निवडमुकीच्या काळात त्यांना येणारा स्वानुभव ही त्यांच्यावरील आपबीतीच वाटते, असे राजकिय जाणकरांचे मत आहे.
प्रामाणिक कार्यकर्त्यांची व्यथा
शिस्तबद्ध असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला बेशिस्त करण्याचे काम बाहेरून आलेल्या व राजकारणात मोठ्या मंडळींची मर्जी राखून जिल्ह्यात राजकारण करणाऱ्या एका नेत्याने लावल्याचे सर्वश्रृत आहे.
पाच सात वर्षांपूर्वी मागच्या दारातून मुंबई गाठण्यासाठी पक्षातीलच झोलबा पाटलालाच्या वाड्यातील सदस्यांना व तालुकास्तरावरील पंचाईतीच्या सेवकांना खीर खाऊ घालून ताटा खालचे मांजर बनविण्याचे काम केले. तेव्हापासून या पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात कोणासाठी आपण राबावे व कशाला पक्षाचे काम करावे अशा प्रकारची भावना निर्माण होऊ लागली आहे.
एक शिस्तबद्ध पक्ष म्हणून नावाजलेल्या पक्षालाही आता गालबोट लागण्याची वेळ आलेली आहे. पुढील काळात या पक्षातील अनेक नेते जनपळभर म्हणतील हाय हाय या दिशेने पाऊले टाकताना दिसतील.
काल परवा झालेल्या निवडणुकीनंतर मीच पक्षाचा खरा सूत्रधार, खरा नेता आहे अशी हुशारी मारणाऱ्या या बाहेरच्या नेत्याला वेळीच पक्षातील ज्येष्ठांनी लगाम घातली नाही तर मात्र, या पक्षाचे उज्वल असलेले भविष्य केव्हाचे संपून जाईल व एक नैराश्याची स्थिती निर्माण होईल,अशी खंतही जुन्या जानत्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहे.

