>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
जिल्ह्यात आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये राजीनाम्यांचा धडाका सुरू झाला असून, नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत पक्षाला रामराम ठोकत आहेत. या घडामोडींमुळे निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुती व विरोधी पक्षांमधील अंतर्गत कलह आता उघड्यावर येत असून, नेत्यांची पळवापळवी आणि पक्षांतराचा खेळ जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण देत आहे.
श्रीवास्तव यांचा राजीनामा, जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप
भाजपच्या जिल्हा महिला व्यापारी आघाडीच्या अध्यक्ष अर्चना श्रीवास्तव यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने यांच्यावर थेट हल्ला चढवत राजीनामा दिला आहे. भाजप आता कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलेला नाही, तो बिझनेस पार्टी बनला आहे. पक्षात सन्मान मिळत नाही,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. त्यांच्या राजीनाम्याने महायुतीच्या घटक पक्षांमधील अंतर्गत शीतयुद्ध पुन्हा चर्चेत आले आहे. अर्चना यांच्या या पवित्र्यामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला मोठा धक्का बसला असून, पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
काँग्रेसमध्येही बंड : स्वाती हेडाऊ यांनी दिली सोडचिठ्ठी
दुसरीकडे, काँग्रेस पक्षालाही मोठा फटका बसला आहे.भंडारा तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष स्वाती हेडाऊ यांनी पक्षाच्या कार्यप्रणालीवर तीव्र नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला. “मला पक्षात विश्वासात घेतले जात नाही. काँग्रेसची कार्यपद्धती निराशाजनक आहे,” असे सणसणीत टोले लगावत त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यांच्या या निर्णयाने काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील नेतृत्वाला मोठा हादरा बसला आहे.
महायुतीत शीतयुद्ध, नेत्यांची धावपळ
भंडारा नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात युती होणार की नाही, यावरून संभ्रम कायम आहे. या तिन्ही पक्षांचे नेते सध्या कार्यकर्ते तसेच स्थानिक नेत्यांना आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी जोरदार चाचपणी करत आहेत. “हा नेता आपल्याकडे आला, तर आपली बाजू भक्कम होईल,” या आशेने नेत्यांची पळवापळवी सुरू आहे. पक्षांतर आणि राजीनाम्यांचे सत्र यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत नवे ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
निवडणुकीपूर्वी राजकीय नाट्य तापले
भाजप आणि काँग्रेसमधील या राजीनाम्यांच्या धडाक्याने भंडारा जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. स्थानिक नेते आपल्या सोयीने पक्षप्रवेश व राजीनामे देत असल्याने दोन्ही पक्षांतील नेतृत्वाला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या घडामोडींचा आगामी निवडणुकीवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः महायुतीतील अंतर्गत गटबाजी आणि काँग्रेसमधील नाराजीनाट्य यामुळे भंडारा नगरपालिकेची निवडणूक आणखी चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
निवडणुकीच्या रणधुमाळीत रंग भरणार
भंडारा जिल्ह्यातील या राजकीय नाट्याने नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आणखी रंग भरण्याची शक्यता आहे. राजीनामे, पक्षांतर आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी यामुळे भंडाऱ्याचे राजकारण सध्या चर्चेचा विषय बनले आहे. आता या घडामोडींचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

