>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करताच, भंडारा जिल्ह्यातही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या नगरपरिषदांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आजपासून या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
जिल्ह्याचा ‘पॉलिटिकल प्लॅन’
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, जिल्ह्यातील या चारही नगरपरिषदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, नामनिर्देशनपत्र दाखल करणे १० नोव्हेंबर पासून सुरुवात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर नामनिर्देशन पत्रांची छाननी १८ नोव्हेंबर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख (अपील नसलेल्या ठिकाणी) २१ नोव्हेंबर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख (अपील असलेल्या ठिकाणी) २५ नोव्हेंबर मतदान २ डिसेंबर (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०) तर, मतमोजणी ३ डिसेंबर असे असणार आहे.
थेट नगराध्यक्षपदासाठी लढाई
या निवडणुकीत सदस्यपदासोबत नगराध्यक्षपदासाठी देखील थेट मतदान होणार आहे. त्यामुळे मतदारांना एकापेक्षा अधिक मते द्यावी लागणार आहेत. भंडारा, पवनी, तुमसर आणि साकोली या नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यी पद्धत असल्याने प्रत्येक मतदाराला साधारणतः तीन ते चार जागांसाठी मतदान करणे अपेक्षित आहे.
जात वैधता प्रमाणपत्रावर ‘वॉच’
राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोहोच पावती नामनिर्देशनपत्रासोबत सादर करण्याची सूट आहे. मात्र, निवडून आल्यास सहा महिन्यांत प्रमाणपत्र सादर न केल्यास निवड रद्द होण्याची तरतूद आहे, त्यामुळे उमेदवारांना या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. या चारही नगरपरिषदांमध्ये होणाऱ्या निवडणुकीमुळे भंडारा जिल्ह्यातील स्थानिक राजकारण ढवळून निघणार असून, सर्वच प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
स्थानिक गटबाजीने वाढवली चिंता
जिल्ह्यातील भंडारा, पवनी, तुमसर आणि साकोली या चार नगरपरिषदांवर सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (दोन्ही गट) यांनी आतापासूनच कंबर कसली आहे. राज्यात महायुती (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट) असे दोन गट असले तरी, स्थानिक पातळीवर ही समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे.
बंडखोरी होण्याची शक्यता
भाजपचा जिल्ह्यात पारंपरिक जनाधार मजबूत आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक असल्याने ‘चेहरा’ महत्त्वाचा ठरणार आहे.भंडारा आणि तुमसर या शहरांवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. महायुतीमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा समावेश असल्याने, नगरसेवक आणि अध्यक्षपदाच्या जागा वाटपावरून स्थानिक पातळीवर संघर्ष निर्माण होऊ शकतो. तिकीट न मिळाल्यास बंडखोरी होण्याची भीती आहे.
नगराध्यक्षपदासाठी अनेक जुन्या आणि नव्या चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत, ज्यामुळे अंतिम निर्णय घेताना पक्षाला कसरत करावी लागणार आहे.या चारही नगरपरिषदा मध्ये अनेक प्रभागांत प्रत्येक पक्षाचे एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत. नगराध्यक्षपदासाठी तर प्रत्येक प्रमुख पक्षात किमान ३ ते ५ दावेदार आहेत. तिकीट वाटप जाहीर झाल्यावर नाराज झालेले अनेक नेते अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. अशा बंडखोरीमुळे प्रमुख पक्षांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून, त्यामुळे याचा फायदा काही अपक्ष उमेदवारांना होण्याची शक्यता आहे.

